IND vs ENG : ‘त्या क्षणी आम्हाला खात्री वाटली की…’, कर्णधार गिलने सांगितला मँचेस्टर कसोटीचा टर्निंग पॉइंट

IND vs ENG Shubman Gill Reaction : मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या कसोटीत कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णीत राखला. गिलने सांगितले की, केएल राहुलसोबतच्या त्याच्या भागीदारीमुळे संघाला हार टाळण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि यामुळे भारतीय संघ एक ‘महान टीम’ असल्याचे सिद्ध झाले. पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडीवर असताना आणि दुसऱ्या डावात शून्य धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर गिल, जडेजा आणि सुंदर यांनी शानदार शतके ठोकत संघाला पराभवापासून वाचवले.
१८८ धावांच्या भागीदारीने विश्वास दिला –
या निकालामुळे भारताला आता पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. बीसीसीआय डॉट टीव्हीशी बोलताना गिल म्हणाला, “१४० षटकांपर्यंत एकच मानसिकता राखणे खूप आव्हानात्मक आहे. चांगली टीम आणि महान टीम यात हाच फरक आहे. मला वाटते, आज आम्ही हे दाखवून दिले की आम्ही एक महान टीम आहोत. शून्य धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर माझी आणि केएल (राहुल) भाई यांच्यातील १८८ धावांची भागीदारीने आम्हाला विश्वास दिला की आम्ही हा सामना वाचवू शकतो.”
सामना अनिर्णीत राखणे खूप समाधानकारक –
𝙄𝙜𝙣𝙞𝙩𝙞𝙣𝙜 𝙩𝙝𝙚 𝘽𝙚𝙡𝙞𝙚𝙛 ✨
Talking Memorable Manchester partnerships with Captain Shubman Gill & Washington Sundar 🤝
WATCH 🎥🔽#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill | @Sundarwashi5 https://t.co/u7ZrWdnMmr
— BCCI (@BCCI) July 28, 2025
शुबमन गिल पुढे म्हणाला, “मी खूप खूश आहे. कालच्या परिस्थितीतून हा सामना अनिर्णीत राखणे खूप समाधानकारक आहे.” केएल राहुलने संयम आणि एकाग्रतेने ९० धावांची खेळी करत गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर जडेजा आणि सुंदर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. वयाच्या २५व्या वर्षी पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व करणारा गिल या मालिकेत अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. त्याने एका द्विशतकासह चार शतकांच्या जोरावर ७०० हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! निर्णायक सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला संघात केले सामील
ही माझी सर्वात समाधानकारक खेळी – गिल
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील या १०३ धावांच्या खेळीला त्याने आपली सर्वोत्तम खेळी म्हटले. शुबमन गिल म्हणाला, “मला वाटते, ही माझी सर्वात समाधानकारक खेळी होती.” गिल बाद झाला तेव्हा संघासमोर दोन सत्रे खेळून काढण्याचे आव्हान होते आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे हे काम आणखी कठीण होते. जडेजा आणि सुंदर यांनी संयमाने आणि एकाग्रतेने फलंदाजी करत ही जबाबदारी चोखपणे पार पाडली.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या दुखापतीने भारताला धक्का; पाचव्या कसोटीसाठी युवा खेळाडूला दिली संधी
आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करताना गिल म्हणाला, “जड्डू भाई आणि वॉशी फलंदाजी करत असताना परिस्थिती सोपी नव्हती. चेंडू काही ना काही हालचाल करत होता. तरीही त्यांनी संयमाने फलंदाजी करत शतके ठोकली, ही खूप मोठी कामगिरी आहे.” त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना शेवटच्या दोन सत्रांमध्ये कोणतीही संधी दिली नाही.





