IND vs ENG : शोएब बशीर फलंदाजी करणार की नाही? ECB च्या ताज्या अपडेटने संभ्रम!

IND vs ENG Shoaib Bashir Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर जखमी झाला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या जोरदार शॉटने बशीरला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि त्याने पुन्हा गोलंदाजी केली नाही. चौथ्या दिवशी त्याने थोडा गोलंदाजीचा सराव केला, पण त्याच्या बोटाला पट्टी बांधलेली होती. त्यामुळे तो फलंदाजी येणार नाही, अशी शक्यता आहे.
शोएब बशीरच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. असे सांगितले जात आहे की, तो चौथ्या डावात गोलंदाजी करू शकेल, पण फलंदाजीबाबत अनिश्चितता आहे. रविवारी (१३ जुलै) ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बशीरने चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी सरावात गोलंदाजी केली, तेव्हा त्याच्या चौथ्या आणि पाचव्या बोटांना मोठ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. आता तो फलंदाजीसाठी पुरेसा तंदुरुस्त होतो की नाही, हे पाहणे बाकी आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे बशीरच्या दुखापतीबाबत निवेदन –
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शोएब बशीरच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. चौथ्या दिवशी सकाळी जारी केलेल्या निवेदनात ईसीबीने म्हटले आहे की, बशीरच्या डाव्या हाताच्या करंगळीला झालेल्या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. तो या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात गोलंदाजी करण्याची अपेक्षा आहे. मात्र, तो तिसऱ्या डावात फलंदाजी करेल की नाही, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. मँचेस्टर येथील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या सहभागाचा आढावा सामन्याच्या शेवटी घेतला जाईल.
हेही वाचा – IND vs ENG : नितीश रेड्डीने क्रॉलीला आणलं गुडघ्यावर, भारताचा लॉर्ड्सवर दबदबा!
बशीरने केएल राहुलची घेतली होती विकेट –
गेल्या वर्षी विशाखापट्टणम येथे भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बशीरने या मालिकेत आतापर्यंत एकूण नऊ विकेट्स घेतल्या आहेत. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने भारताचा सलामीवीर केएल राहुलला बाद केले, ज्याने १०० धावांची खेळी केली होती. जर बशीर मँचेस्टरच्या चौथ्या कसोटीसाठी तंदुरुस्त नसेल, तर इंग्लंडचा संघ लियाम डॉसन, जॅक लीच किंवा रेहान अहमद यांना खेळवण्याचा विचार करू शकतो.





