IND vs ENG Semifinal : टीम इंडियाकडे १२ वर्षांनंतर इतिहास रचण्याची संधी! श्रीलंकेनंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरु शकतो दुसराच संघ
IND vs ENG Semifinal : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच असे घडले आहे की, यजमान देशाने (Host Nation) अंतिम फेरी गाठली आहे.

IND vs ENG Semifinal 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा सेमीफायनलचा थरार आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंडने आधीच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यातून दुसरा फायनलिस्ट संघ निश्चित होईल. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
यजमान देशाचा १२ वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच असे घडले आहे की, यजमान देशाने (Host Nation) अंतिम फेरी गाठली आहे. २०१२ मध्ये श्रीलंकेने यजमान म्हणून खेळताना फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र, फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आज जर भारताने इंग्लंडला पराभूत केले, तर यजमान म्हणून फायनल गाठणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरेल.
भारतासमोर दुहेरी इतिहास रचण्याची संधी –
An epic Semi-Final awaits 🔥
The battle for a ticket to the #T20WorldCup Final gets underway shortly! 🎟️#TeamIndia | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/WeYw8mOmdm
— BCCI (@BCCI) March 5, 2026
टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर ते श्रीलंकेच्या विक्रमाची बरोबरी करतील, पण खरी ऐतिहासिक कामगिरी फायनलमध्ये होऊ शकते:
- विजेता यजमान देश: टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकाही यजमान देशाला जेतेपद मिळवता आलेले नाही. भारताने फायनल जिंकल्यास ते विश्वचषक जिंकणारे पहिले यजमान ठरतील.
- बॅक टू बॅक जेतेपद: आजवर कोणत्याही संघाला सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. २०२४ चा चॅम्पियन असलेला भारत हा पराक्रम करणारा पहिला संघ बनू शकतो.
सूर्याची पहिलीच परीक्षा –
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली असून, आता त्याचे लक्ष्य जेतेपदावर आहे. या स्पर्धेत भारताने केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक सामना गमावला आहे.





