IND vs ENG Semifinal : इंग्लंडला बसली ७४ धावांची ‘पेनल्टी’! कर्णधार हॅरी ब्रूकची ‘ती’ चूक पडली टीम इंडियाच्या पथ्यावर
IND vs ENG Semifinal : या मोठ्या धावसंख्येमागे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची एक मोठी चूक कारणीभूत ठरली, ज्याची किंमत इंग्लंडला तब्बल ७४ जास्तीच्या धावा देऊन मोजावी लागली.

IND vs ENG Semifinal England costly mistake : टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडसमोर २५३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी ब्रिटीश गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. मात्र, या मोठ्या धावसंख्येमागे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची एक मोठी चूक कारणीभूत ठरली, ज्याची किंमत इंग्लंडला तब्बल ७४ जास्तीच्या धावा देऊन मोजावी लागली.
नेमकं काय घडलं?
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय संघ थोडा दबावात होता. अशा स्थितीत तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू थेट मिड-ऑनवर उभ्या असलेल्या हॅरी ब्रूकच्या हातात गेला. हा झेल इतका सोपा होता की ब्रूकला जागेवरून हालण्याचीही गरज नव्हती. मात्र, ब्रूकच्या हातातून चेंडू निसटला आणि संजूला १५ धावांवर असताना जीवनदान मिळाले.
जीवनदान मिळाल्यानंतर सॅमसनचा दिसला ‘रुद्रावतार’ –
Innings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men’s T20 World Cup knockouts 🔥👏
Over to the bowlers to defend this 🙌
Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT
— BCCI (@BCCI) March 5, 2026
संजू सॅमसनने या जीवदानाचा असा काही फायदा उठवला की इंग्लंडचे गोलंदाज हतबल झाले. त्याने अवघ्या २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जेव्हा संजू १४ व्या षटकात बाद झाला, तेव्हा त्याच्या नावावर ४२ चेंडूत ८९ धावा होत्या. म्हणजेच, झेल सुटल्यानंतर संजूने आपल्या धावसंख्येत आणखी ७४ धावांची भर घातली. ही ७४ धावांची ‘पेनल्टी’ इंग्लंडला महागात पडली.
वानखेडेवर भारताच्या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस –
भारताने या सामन्यात २५३ धावांचा डोंगर उभा केला आहे. संजूच्या ८९ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला हा पल्ला गाठता आला. इंग्लंडसाठी हा सुटलेला झेल केवळ एक विकेट नव्हती, तर सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर शिवम दुबेनेही ४३ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने एक विकेट्स घेतली.





