IND vs ENG : बाहेर बसवलं, डावललं, आता थेट इतिहासच लिहला! संजू सॅमसनचा सेमीफायनलमध्ये सर्वात मोठा धमाका
IND vs ENG : या विश्वचषकात तीन वेळा पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

IND vs ENG Sanju Samson T20 World Cup 2026 Fifty : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ज्या संजू सॅमसनला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळत नव्हते, त्याच संजूने आता आपल्या कामगिरीने सर्वांची बोलती बंद केली आहे. ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सॅमसनने स्फोटक अर्धशतक झळकावत इतिहास रचला.
सूर्यानेही व्यक्त केली होती हतबलता –
विश्वचषकाच्या सुरुवातीला कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “अभिषेक शर्मा किंवा तिलक वर्मासारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना बाजूला सारून मी संजूला संधी कशी देऊ?” मात्र, सुपर-८ मधील एका पराभवाने समीकरणे बदलली आणि संजूची संघात एन्ट्री झाली. त्यानंतर संजूने मागे वळून पाहिले नाही.
वानखेडेवर सॅमसनचा थरार –
A Sanju Samson Show at Wankhede 🍿
Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/lbBhfokEZK
— BCCI (@BCCI) March 5, 2026
अभिषेक शर्मा स्वस्तात (९ धावा) बाद झाल्यानंतर सर्व मदार संजू सॅमसनवर होती. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ धावांची खेळी करणाऱ्या संजूने तोच फॉर्म कायम राखला. सुरुवातीला १४ धावांवर असताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने त्याचा सोपा झेल सोडला आणि त्यानंतर संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने अवघ्या २६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
युवराज सिंगनंतरचा सर्वात वेगवान फलंदाज –
टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (Knockout) सामन्यात भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत संजू आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
- युवराज सिंग: २० चेंडू (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००७)
- संजू सॅमसन: २६ चेंडू (विरुद्ध इंग्लंड, २०२६)
विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही!
अर्धशतकाव्यतिरिक्त संजूने असा एक विक्रम केला जो आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमला नव्हता. या विश्वचषकात तीन वेळा पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
- नामिबिया विरुद्ध: रुबेन ट्रम्पलमनच्या गोलंदाजीवर षटकार.
- सुपर-८ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध: रिचर्ड नगारावाच्या गोलंदाजीवर षटकार.
- उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध: जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकात षटकार.
भारताने इंग्लंडसमोर ठेवले २५४ धावांचे लक्ष्य –
Innings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men’s T20 World Cup knockouts 🔥👏
Over to the bowlers to defend this 🙌
Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT
— BCCI (@BCCI) March 5, 2026
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात गडी बाद २५३ धावा केल्या. इंग्लंडकडून संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. शिवम दुबेनेही ४३ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरने एक बळी घेतला.





