IND vs ENG : ‘…अनुभव असताना देखील’, लीडसच्या पराभवानंतर संजय मांजरेकरांनी पुन्हा जडेजाला डिवचले

या सामन्यात रवींद्र जडेजाने फक्त एक विकेट्स घेतली आणि १७२ धावा दिल्या. जडेजाच्या या कामगिरीनंतर आता मांजरेकर यांनी त्याच्यावर टीका केली आहे. मांजरेकर यांनी लीड्स कसोटी सामन्यात जडेजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली आणि त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तरुण खेळाडूंवर जास्त टीका करणे योग्य नाही –
संजय मांजरेकर म्हणाले की, ‘प्रसिध कृष्णासारख्या तरुण गोलंदाजांना लक्ष्य करणे योग्य नाही. ते म्हणाले की जडेजा सामन्याच्या शेवटच्या दिवशी खेळपट्टीचा फायदा घेऊ शकला असता, परंतु इतका अनुभव असूनही तो चमत्कार करू शकला नाही, असा हल्ला त्यांनी जडेजावर चढवला. संजय मांजरेकर पुढे म्हणाले की प्रसिध कृष्णासारख्या तरुण खेळाडूंवर जास्त टीका करणे योग्य नाही. त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता स्पष्ट आहे. परंतु मी रवींद्र जडेजावर टीका करेन.’
हेही वाचा – क्रिकेट विश्वात खळबळ! वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवर ११ महिलांनी केला लैंगिक अत्याचाराचा आरोप
अनुभव असूनही जडेजाने केली निराशा –
मांजरेकर पुढे म्हणाले, ‘तो सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यासाठी खेळपट्टीवर काही कठीण परिस्थिती होती, ज्याचा तो फायदा घेऊ शकला असता. अशा अनुभवी खेळाडूकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहेत. जेव्हा तुम्ही अनुभवी गोलंदाज आणि फलंदाजांसोबत काम करत असता तेव्हा त्यांच्याकडून उच्च पातळीची धोरणात्मक समज अपेक्षित असते. कुठेतरी मला असे वाटले की जडेजाने निराशा केली. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून कोणतीही मदत मिळत नसली तरी, या खेळपट्टीत जडेजासाठी काहीतरी होते. पण तरीही तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही’, अशा शब्दात मांजरेकर यांनी जडेजाला सुनावले.





