IND vs ENG : नाद करा पण बुमराहचा कुठं..! रूट-स्टोक्सचा त्रिफळा उडवत इंग्लंडची मोडली कंबर, पाहा VIDEO

IND vs ENG Jasprit Bumrah’s Fiery Spell : लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने कहर केला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. त्याच्या हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर इंग्लंडचे दिग्गज फलंदाज हतबल झाले. बुमराहने अवघ्या दोन षटकांत जो रूट, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांना बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे त्याने स्टोक्स आणि रूटचा त्रिफळा उडवला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात दिसला बुमराहचा जलवा –
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जो रूटने बुमराहच्या षटकात चौकार मारत लॉर्ड्सवर आपले आठवे शतक पूर्ण केले. पण इंग्लंडसाठी हा आनंद फार काळ टिकला नाही. बुमराहने पहिल्यांदा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवला. हवेत स्विंग होणाऱ्या बुमराहच्या चेंडूने स्टोक्सला चकवले.यानंतर पुढच्याच षटकात बुमराहने जो रूटची शतकी खेळी पण संपुष्टात आणली. बुमराहच्या या दमदार गोलंदाजीने इंग्लंडची फलंदाजी अक्षरशः कोलमडली.
THE GREATEST – JASPRIT BUMRAH 🫡 pic.twitter.com/gxjQxL4unl
— Johns. (@CricCrazyJohns) July 11, 2025
बुमराहने रुटची उडवली मधली स्टंप –
Jasprit Bumrah gets the No.1 Test batter on Day 1 and the No.2 Test batter on Day 2. 🐐
Elite bowling, elite consistency — Bumrah continues to dominate the world’s best.⁰#INDvsENG #ENGvIND— Kavya Maran (@Kavya_Maran_SRH) July 11, 2025
जो रूट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसला. बुमराहने मधली स्टंप उडवत रुटला माघारी पाठवले आणि भारतीय संघाचे सामन्यात कमबॅक केले. रुटने १९९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी साकरली. यानंतर बुमराहने ख्रिस वोक्सला तर खातेही उघडू दिले नाही आणि ध्रुव जुरेलच्या हाती झेल देऊन त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अवघ्या दोन षटकांत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंडने १०५ षटकानंतर ७ बाद ३५३ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटचं क्रिकेटच्या पंढरीत विक्रमी शतक! अनेक दिग्गजांना टाकलं मागं
रुटसाठी बुमराह पुन्हा ठरला कर्दनकाळ –
जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा जो रूटसाठी कर्दनकाळ ठरला आहे. जस्सीने कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा रूटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. बुमराहविरुद्ध रूटने आतापर्यंत ६१२ चेंडूंचा सामना केला आहे. यात त्यानी ३११ धावा केल्या, पण ११ वेळा बादही झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघेही इंग्लंडच्या माजी कर्णधाराला ११ वेळा बाद करणारे गोलंदाज ठरले आहेत.





