IND vs ENG : भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; परदेशात प्रथमच पाचव्या कसोटीत केला ‘हा’ खास पराक्रम
IND vs ENG Anderson Tendulkar Trophy 2025 Result : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 6 धावांनी थरारक विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे आव्हान दिले होते, परंतु इंग्लंडचा संघ 367 धावांवर सर्वबाद झाला. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्या दमदार गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. यासह भारतीय संघाने ओव्हल कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे.
परदेशात प्रथमच पाचव्या कसोटीत विजय –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच परदेशात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला आहे. यापूर्वी भारताने परदेशात 16 वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या होत्या, ज्यात 6 वेळा शेवटच्या सामन्यात पराभव, तर 10 वेळा सामना अनिर्णित राहिला होता. अखेर भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी करत हा टप्पा गाठला.
रूट-ब्रूकची शतकी खेळी ठरली व्यर्थ –
Test cricket… absolute goosebumps.
Series 2–2, Performance 10/10!SUPERMEN from INDIA! What a Win. 💙🇮🇳🏏 pic.twitter.com/ORm1EVcbRH
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 4, 2025
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतकी खेळी करत संघाला आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. ब्रूकने 91 चेंडूंमध्ये शतक झळकावत 111 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रूटने 110 धावांची खेळी केली. सलामीवीर बेन डकेटनेही 54 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, पाचव्या दिवशी सिराज आणि कृष्णा यांनी शानदार गोलंदाजी करत तीन विकेट झटपट घेतले. दुखापतीनंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी उतरला, पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. सिराजने दुसऱ्या डावात 5, तर कृष्णाने 4 विकेट घेतल्या. गस ॲटकिन्सन 17 धावा काढून शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला.
भारताची पहिली खेळी निराशाजनक
भारताने पहिल्या डावात फक्त 224 धावा केल्या. करुण नायरने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली, परंतु इतर फलंदाज अपयशी ठरले. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 64 धावा केल्या, तर भारताकडून सिराज आणि कृष्णा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs ENG : जो रूटची ऐतिहासिक कामगिरी! भारताविरुद्ध तिसऱ्यांदा ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू
यशस्वी जैस्वालने झळकावले दमदार शतक –
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. यशस्वी जैस्वालने 118 धावांची शतकी खेळी केली. नाईटवॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीपने 66 धावांची खणखणीत खेळी केली. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 53 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा करत 374 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र इंग्लंडचा संघ 367 धावांत गारद झाला.





