Ind Vs Eng : गिल-गंभीरचं टेन्शन मिटलं ! चौथ्या टेस्टआधी ‘हा’ खेळाडू झाला फिट

मॅनचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्या, २३ जुलै २०२५ पासून मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींचा फटका बसला होता, परंतु आता उपकर्णधार रिषभ पंतच्या पुनरागमनाने संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्णधार शुभमन गिल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रिषभ पंत चौथ्या कसोटीत विकेटकिपिंगसह खेळण्यासाठी सज्ज आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावरील मागील सामन्यात रिषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला (तर्जनी) दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली होती. तिसऱ्या कसोटीतही जुरेलने विकेटकिपिंग केली होती, त्यामुळे चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता होती. मात्र, आता पंत पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने तो विकेटकिपिंगसह संघात परतला आहे. यामुळे ध्रुव जुरेलला संघाबाहेर बसावे लागेल आणि कर्णधार गिल याच्यावरील ताणही कमी होईल.रिषभ पंतच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मजबुती मिळाली असून, चाहत्यांमध्येही उत्साह संचारला आहे.
मात्र तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, हा प्रश्न कायम आहे. करुण नायरला पुन्हा संधी मिळणार की साई सुदर्शनला आणखी एक संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांना यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. त्यांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर/साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.





