India Squad For 2nd Test Against England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर इंग्लंडकडून कसोटी सामना गमावला.
आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याच्यासह डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत.(Ravindra Jadeja & KL Rahul ruled out of the second Test) अशा परिस्थितीत त्यांच्या जागी सरफराज, वॉशिंग्टन आणि सौरभ यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
The Men’s Selection Committee have added Sarfaraz Khan, Sourabh Kumar and Washington Sundar to India’s squad.#INDvENG https://t.co/xgxI8NsxpV
— BCCI (@BCCI) January 29, 2024
सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत होता. मात्र, तरीही त्याला टीम इंडियाकडून संधी दिली जात नव्हती. आता राहुलच्या दुखापतीमुळे सरफराजचे नशीब पालटले आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत सरफराज हा पदार्पण करू शकतो, अशी अपेक्षा आहे. 26 वर्षीय सरफराजला देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत 45 प्रथम श्रेणी, 37 लिस्ट-ए आणि 96 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात सरफराजने 14 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत, त्याची सर्वात मोठी खेळी 301 धावांची नाबाद होती. सरफराजने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 69.85 च्या सरासरीने आणि 70.48 च्या स्ट्राइक रेटने 3,912 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए सामन्यांमध्ये 34.94 च्या सरासरीने आणि 94.16 च्या स्ट्राइक रेटने 629 धावा केल्या आहेत तसेच टी-20 सामन्यांमध्ये त्याने 22.41च्या सरासरीने आणि 128.29 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 188 धावा केल्या आहेत.
सर्फराजने नुकतेच भारत-अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध दमदार शतक(161 धावा) केले होते. त्याचवेळी, सौरभ कुमारची चेंडूसह कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने एका डावात पाच विकेट्स घेतल्या. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला आहे. मात्र, आवेश खान आपल्या रणजी संघ मध्य प्रदेशसोबत राहणार असून गरज पडेल तेव्हाच तो टीम इंडियामध्ये सामील होईल, असं बीसीआयने म्हटले आहे.
हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जडेजाला हाताला दुखापत झाली होती तसेच तो पायाच्या स्नायूच्या ताणाने (हॅमस्ट्रिंग) त्रस्त आहे, तर केएल राहुल याला उजव्या मांडीत त्रास असल्याची तक्रार आहे. त्यामुळे केएल राहुल हा देखील दुसऱ्या सामन्यात नसणार आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोघांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा, ICC ने घेतला ‘हा’ निर्णय…
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.