IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने ‘प्लेइंग-11’ची केली घोषणा, केवळ एकाच वेगवान गोलंदाजाचा समावेश…

England Playing 11 Vs India 1st Test : इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लिश संघाला भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या गुरुवार, 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. खेळपट्टीचा विचार करता बेन स्टोक्सने अंतिम अकरामध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. याशिवाय हॅरी ब्रूकच्या जागी बेन फॉक्सला संधी मिळाली आहे.
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर जॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरुवात करतील. यानंतर ऑली पोप आणि त्यानंतर अनुभवी फलंदाज जो रूट खेळताना दिसणार आहेत. जॉनी बेअरस्टो पाचव्या क्रमांकावर खेळेल. मात्र, त्याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असणार नाही. अशा परिस्थितीत तो फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यानंतर कर्णधार स्टोक्स येईल. या संपूर्ण मालिकेत स्टोक्स फक्त सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर यष्टिरक्षक बेन फॉक्स खेळणार आहे. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ सात फलंदाजांसह पहिल्या कसोटीत उतरणार आहे.
We’ve named our XI for the first Test in Hyderabad! 🏏
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) January 24, 2024
तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश…
हैदराबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. त्यात लेगस्पिनर रेहान अहमद, डावखुरा ऑफस्पिनर जॅक लीच आणि युवा टॉम हार्टली यांचा समावेश आहे. टॉम हार्टले हैदराबादमध्ये पदार्पण करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने केवळ मार्क वुडचाच वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. त्याच्यासोबत बेन स्टोक्स दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, जेक लीच आणि मार्क वुड.





