IND vs ENG : डकेट-क्रॉलीने भारताविरुद्ध रचला इतिहास! मोडला ७२ वर्षांचा सर्वात मोठा विक्रम

IND vs ENG Duckett Crawley Record : इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी मंगळवारी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. लीड्स येथे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ऐतिहासिक १८८ धावांची दमदार भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत नव्या विक्रमाची नोंद करत ७२ वर्षांचा जुना विक्रम मोडला.
बेन डकेटने १७० चेंडूंत १४९ धावा केल्या, ज्यात २१ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सहावे आणि दुसऱ्या डावातील पहिले शतक आहे. दुसरीकडे, झॅक क्रॉलीने १२६ चेंडूंचा सामना करत ६५ धावा जमवल्या. त्याच्या बॅटमधून सात चौकार निघाले. खरं तर, डकेट आणि क्रॉली यांनी भारताविरुद्ध चौथ्या डावात सर्वात मोठी सलामीची भागीदारी करण्याचा पराक्रम केला आहे.
डकेट आणि क्रॉलीने मोडला ७२ वर्षांपूर्वीचा विक्रम –
What an incredible opening stand.
Well batted, boys 👊 pic.twitter.com/i1wXmLy5Jo
— England Cricket (@englandcricket) June 24, 2025
या दोघांनी ॲलन रे आणि जेफ्री स्टॉलमेयर यांचा ७२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडीजच्या ॲलन आणि जेफ्री यांनी १९५३ मध्ये भारताविरुद्ध चौथ्या डावात १४२ धावांची भागीदारी केली होती. तो सामना अनिर्णित राहिला होता. विशेष म्हणजे, डकेट हा गेल्या १५ वर्षांत इंग्लंडसाठी चौथ्या डावात शतक झळकावणारा एकमेव सलामीवीर आहे. त्याच्यापूर्वी ॲलिस्टर कूकने ही कामगिरी केली होती. माजी इंग्लिश कर्णधार कूक यांनी २०१० मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध नाबाद १०९ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG : बेन डकेटने रचला इतिहास! लीड्स कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा इंग्लंडचा ठरला पहिलाच खेळाडू
चहापानापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद २६९ धावा –
लीड्स कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात एकही गडी गमावला नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताने जोरदार पुनरागमन करत चार गडी बाद केले. इंग्लंडला पहिला धक्का क्रॉलीच्या रूपाने बसला, ज्याला प्रसिद्ध कृष्णाने ४३व्या षटकात बाद केले. प्रसिधने ४५व्या षटकात ऑली पोपला (८) बोल्ड केले. शार्दुल ठाकुरने डकेट आणि हॅरी ब्रूक (०) यांना सलग चेंडूंवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. चहापानाच्या वेळी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील धावसंख्या २६९/४ अशी होती.





