IND vs ENG : चार वर्षात १५ खेळाडूंच पदार्पण! मग फक्त ‘या’ खेळाडूवरच इतका अन्याय का?

अभिमन्यु 2021-22 पासून भारतीय कसोटी संघासोबत आहे, पण भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर उतरण्याचे त्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. अभिमन्यू ईश्वरन गेल्या सुमारे चार वर्षांपासून संघात येत आहे आणि पाणी पुरवण्याचे काम करत आहे, ड्रेसिंग रूममध्ये अभिमन्युने खूप वेळ घालवला आहे, पण भारतीय संघाच्या जर्सीत खेळण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले आहे. अभिमन्यू भारतीय संघात आल्यानंतर 15 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे, ज्यात सूर्यकुमार यादव, रजत पाटीदार, इशान किशन यांसारख्या युवा फलंदाजांचा समावेश आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये क्षमता सिद्ध करुनही दुर्लक्ष –
तरीही, अभिमन्यू सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करत असूनही, तो फक्त बाकावरच बसून आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अभिमन्यूच्या नावावर 27 शतके आणि 7,841 धावा आहेत. तसेच, त्याने 31 अर्धशतकेही केली आहेत. काही काळापूर्वी देशांतर्गत क्रिकेटबाबत मोठी चर्चा रंगली होती. प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देण्याची गोष्ट सांगितली. स्वतः भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू संधीचे हकदार आहेत. परंतु प्रत्यक्षात सत्य काही वेगळेच आहे.
हेही वाचा – IND vs ENG : भारतीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेलं ‘ते’ ९३ वर्षांनी मँचेस्टरमध्ये घडलं, नक्की काय झालं?
प्रशिक्षक महोदय ड्रेसिंग रूममध्ये बसून अभिमन्यूसोबत न्याय करू शकलेले नाहीत. जवळपास 8,000 धावा आणि 27 शतके असूनही जर एखादा फलंदाज गेल्या चार वर्षांपासून फक्त बाकावरच बसत असेल, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवण्याचा काय फायदा? अभिमन्यू आणि सुदर्शन यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे, याबाबत चर्चा करताना दोघांचे आकडेवारी आणि अनुभव यांचा विचार करणे आवश्यक आहे. अभिमन्यू ईश्वरन याने 103 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 54 च्या सरासरीने रन बनवले आहेत, जे त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे द्योतक आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ख्रिस वोक्सच्या घातक चेंडूने जैस्वालच्या बॅटचे केले दोन तुकडे, पाहा VIDEO
अभिमन्यू की सुदर्शन कोण सरस?
दुसरीकडे, साई सुदर्शन याने 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 36 च्या सरासरीने 1987 रन बनवले आहेत. सुदर्शनने 51 डावांमध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत, तर अभिमन्यूचा अनुभव आणि आकडेवारी यामध्ये तो स्पष्टपणे पुढे आहे. सुदर्शनला आयपीएल 2025 मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्धी मिळाली, परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अनुभव आणि सातत्य याबाबतीत अभिमन्यु त्याच्यावर सरस ठरतो. त्यामुळे, आकडेवारी आणि अनुभवाच्या आधारावर अभिमन्यू सुदर्शनपेक्षा श्रेष्ठ मानला जाऊ शकतो.





