Ind Vs Eng : मॅनचेस्टर टेस्टआधी बेन स्टोक्सने टीम इंडियाला डिवचलं ! म्हणाला…

मॅनचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टेस्ट मॅचला 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय संघाला चेतावणी देताना म्हटलं आहे की, भारतीय खेळाडूंच्या कोणत्याही आक्रमकतेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. “आम्ही शाब्दिक युद्धात मागे हटणार नाही,” असं स्टोक्सने ठणकावून सांगितलं.
पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. मागील तीनही सामन्यांमध्ये केवळ बॅट आणि बॉल यांच्यातच तीव्र स्पर्धा झाली नाही, तर मैदानावर शुभमन गिल, मोहम्मद सिराज, जॅक क्रॉली, बेन डकेट, स्टोक्स आणि हॅरी ब्रूक यांच्यात शाब्दिक चकमकीही रंगल्या. या पार्श्वभूमीवर स्टोक्सला चौथ्या टेस्टआधीच्या वादांबाबत विचारलं असता तो म्हणाला, “आम्ही मुद्दाम स्लेजिंग सुरू करणार नाही, पण समोरून आव्हान आलं तर मागे हटणार नाही. ही मोठी मालिका आहे, आणि दोन्ही संघांवर दबाव आहे. आक्रमकतेला हलक्यात घेतलं जाणार नाही.”
लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी सामना उशिरा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने सिराज आणि गिल संतप्त झाले होते. गिलने डकेटकडे बोट दाखवत तीव्र प्रतिक्रिया दिली, तर डकेटनेही त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिलं. स्टोक्सने या घटनेचं समर्थन करताना सांगितलं, “झॅक आणि बेन मैदानात आले, आणि गोष्टी तापल्या. त्याचा आम्हाला फायदा झाला, आणि आमच्या उर्जेमुळे व कौशल्यामुळे आम्ही तो सामना जिंकलो.”





