India Squad For 2nd Test : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताच्या विजयानंतर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी पुरुष निवड समितीने हाच संघ कायम ठेवला आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी असलेल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसऱ्या कसोटीसाठीही तोच 16 सदस्यीय संघ कायम ठेवण्यात आला आहे.
🚨 NEWS 🚨
India retain same squad for 2nd Test against Bangladesh.
More Details 🔽 #TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBankhttps://t.co/2bLf4v0DRu
— BCCI (@BCCI) September 22, 2024
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
भारताने पहिली कसोटी जिंकली 280 धावांनी…
चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने चौथ्या दिवशी 280 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम खेळून भारताने अश्विनच्या शानदार शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावाच करू शकला. यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली आणि भारताने 287 धावांवर डाव घोषित केला आणि बांगलादेशला 515 धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 234 धावांवर गारद झाला. अश्विनने दुसऱ्या डावात भारताकडून 6 बळी घेतले. यासह चौथ्यांदा त्याने एका कसोटीत शतक आणि पाच बळी घेण्याची कामगिरी केली.