Ind vs Ban 1st Test (Day 2) : रोहित शर्मा दुसऱ्या डावातही ठरला फ्लॉप, बांगलादेश विरुद्ध खराब कामगिरीची मालिका कायम….

IND vs BAN Test Series (Rohit Sharma) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्धची निराशाजनक कामगिरी कायम आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या रोहितकडून दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या अपेक्षित होती पण हिटमॅनने दुसऱ्या डावातही निराशा केली आणि स्वस्तात विकेट गमावून तो तंबूत परतला.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माने केवळ 6 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला हसन महमूदनं बाद केलं होते. टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांना दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती पण रोहित दुसऱ्या डावात 7 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला. रोहितला तस्किन अहमदने बाद केले.
बांगलादेशविरुद्ध रोहितची कामगिरी अतिशय निराशाजनक….
रोहित शर्माचा केवळ चेन्नई कसोटीतच नाही तर बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी सामन्यांमध्ये अतिशय खराब रेकॉर्ड आहे. रोहितचा विक्रम पाहता त्याचा बांगलादेशविरुद्धचा विक्रम इतका वाईट असल्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. बांगलादेशविरूध्द चेन्नई कसोटीसह एकूण 4 कसोटी सामन्यांच्या 5 डावात रोहितने केवळ 44 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 आहे. रोहितने याआधी 2019 मध्ये शेजारील देशाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहितचा दर्जा लक्षात घेता त्याचा रेकॉर्ड इतका खराब आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. क्रिकेट जगतात भरपूर धावा करणाऱ्या रोहित शर्माची कामगिरी बांगलादेशविरुद्ध काही खास राहिलेली नाही.
रोहितची कसोटी कारकिर्द….
रोहित शर्माने आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 103 डावात 4 हजार 148 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 12 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत. त्याची एकूण सरासरी 45 च्या वर आहे. अशी कामगिरी करूनही त्यांचे बांगलादेशविरुद्धचे अपयश, तेही घरच्या विकेटवर, समजण्यापलीकडे आहे. आता कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहितची बॅट चालते की नाही हे पाहायचे आहे. कानपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. रोहितने संयम दाखवला तर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दीर्घकाळ चाललेली कसोटीतील निराशाजनक कामगिरी तो मागे सोडू शकतो.





