IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, कोहलीचे दमदार शतक अन् टीम इंडिया विजयापासून 7 विकेट दूर….

IND vs AUS 1st Test Day 3 Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जात आहे. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे कारण यापैकी एक संघ मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करेल.
दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे अन् दुसऱ्या दिवसाप्रमाणे तिसऱ्या दिवसाच्या खेळावरही भारताचे वर्चस्व राहिले आहे. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले आहे. दुसऱ्या डावात कांगारूंनी अवघ्या 12 धावांत तीन विकेट गमावल्या आहेत. बुमराहने मार्नस लॅबुशेनला LBW बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला.
भारताने ऑस्ट्रेलियापुढे 534 धावांचे लक्ष्य ठेवले असून कांगारूचा संघ अजूनही 522 धावांनी मागे आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 12 धावांत (नॅथन मॅकस्वीनी 0, पॅट कमिन्स 2, मार्नस लॅबुशेन3) तीन विकेट गमावल्या आहेत. उस्मान ख्वाजा तीन धावा करून नाबाद आहे. बुमराहने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत, तर सिराजला एक विकेट मिळाली आहे.
Captain Jasprit Bumrah puts the perfect finishing touch on India’s stunning day in Perth 👏#WTC25 | 📝 #AUSvIND: https://t.co/9dLP4pnE0g pic.twitter.com/ugTntLznEe
— ICC (@ICC) November 24, 2024
भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 487 धावा करून डाव घोषित केला. दुसऱ्या डावात 487 धावा करण्यापूर्वी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडे 46 धावांची आघाडी होती. या अर्थाने भारताची एकूण आघाडी 533 धावांची झाली असून कांगारूना 534 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
विराटचे ऐतिहासिक शतक…
विराट कोहलीच्या शतकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमकडून डाव घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विराटने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. लियॉनच्या चेंडूवर चौकार मारून विराटने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक आणि तिन्ही फॉरमॅटमधील एकूण 81 वे शतक होते. त्याचे हे ऑस्ट्रेलियातील सातवे शतक ठरले. सचिन तेंडुलकरला मागे टाकत ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके करणारा तो भारतीय फलंदाज ठरला. सचिनने सहा शतके झळकावली होती. विराटशिवाय नितीश रेड्डी 27 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. नितीश आणि विराटने सातव्या विकेटसाठी 54 चेंडूत 77 धावांची अखंड भागीदारी केली.
विराटपूर्वी यशस्वी जैस्वालने शतक झळकावले होते आणि 161 धावांची खेळी खेळली होती. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. तर केएल राहुलने पाच चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने 25 आणि वॉशिंग्टन सुंदरने 29 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल काही खास करू शकले नाहीत आणि प्रत्येकी 1-1 धावा करून बाद झाले. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लायनने 2 तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





