IND vs AUS : विराट कोहलीने फलंदाजीला येण्यापूर्वीच रचला इतिहास! मोडला राहुल द्रविडचा मोठा विक्रम

IND vs AUS Semi final Champions Trophy 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिला उपांत्य सामना दुबईच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्वबाद २६४ धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारताला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी २६५ धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने फलंदाजीला न उतरताच मोठा इतिहास रचला आहे. त्याने हा खास पराक्रम करताना राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे.
विराटने मोडला द्रविडचा विक्रम –
विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जोश इंग्लिसचा झेल घेत विराटने ही कामगिरी केली. टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३५ झेल घेतले आहेत.
विराट कोहलीने रचला इतिहास –
VIRAT KOHLI HAS TAKEN MOST CATCHES AS A FIELDER FOR INDIA IN INTERNATIONAL CRICKET. 🇮🇳 pic.twitter.com/p2YQCipkug
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 4, 2025
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता ३३६ झेल घेतले आहेत. तर द्रविडने ३३४ झेल घेतले होते. विराटने कांगारू फलंदाज जोश इंग्लिसचा झेल घेऊन ही खास कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम किंग कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने अलिकडेच मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला.
भारताला मिळाले २६५ धावांचे लक्ष्य –
उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ २६४ धावांवर ऑलआउट झाला. संघाच्या वतीने कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजी केली आणि ७३ धावांची दमदार खेळी केली. त्याच वेळी, अॅलेक्स कॅरीने ६१ धावांचे योगदान दिले. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. मॅक्सवेलने त्याच्या कामगिरीने खूप निराश केले आणि फक्त ७ धावा करून बाद झाला. गोलंदाजीत, मोहम्मद शमीने भारताकडून कहर केला आणि तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकी चेंडूची जादूही शिगेला पोहोचली आणि त्याने ४० धावा देऊन दोन बळी घेतले.





