IND vs AUS 3rd Test | तिसऱ्या दिवशीही पाऊस ठरला खलनायक, केवळ 33.1 षटकांचा झाला खेळ; टीम इंडिया अडचणीत…

IND vs AUS 3rd Test (Stumps on Day 3 in Brisbane) | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. आता पुन्हा तिसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ 33.1 षटकांचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 51 धावांत चार विकेट गमावल्या होत्या.
गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे सुमारे आठ वेळा खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबून-थांबून पुन्हा पुन्हा येतच होता. शेवटी त्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. पुढच्या दोन दिवसांतही असेच काहीसे घडू शकते, कारण पुढील दोन दिवस ब्रिस्बेनमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांच्या अंदाजानुसार म्हणजेच Accuweather नुसार ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची 100% आणि 89% शक्यता आहे.
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला कालच्या धावसंख्येमध्ये अधिक धावा करता आल्या नाहीत. यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने आपले अर्धशतक पूर्ण केले. 88 चेंडूत 70 धावा करून तो बाद झाला. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 2 षटकार आले. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 445 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. यंदा प्रथमच कांगारू संघ 400 धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर सिराजनं 2, आकाशदीप अन् नितेश रेड्डीनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. मिचेल स्टार्कला (18) बुमराहने तर नॅथन लायनला (02) सिराजने बाद केले. त्याचवेळी आकाश दीपने कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने कालच्या सात बाद 405 धावसंख्येवरून पुढे खेळताना आणखी 40 धावा जोडल्या आणि उर्वरित तीन विकेट गमावल्या. ॲलेक्स कॅरीने 88 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तो बाद होणारा शेवटचा फलंदाज होता, तर काल ट्रॅव्हिस हेड(152) आणि स्टीव्ह स्मिथ (101) यांनी शानदार शैलीत शतके झळकावून ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.
Despite SIX breaks for rain in Brisbane, it’s advantage Australia with two days of play lefthttps://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/e4e3VLAfca
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 16, 2024
भारतीय फलंदाज पुन्हा ठरले फ्लॉप…
भारत सध्या ऑस्ट्रेलियाच्या 394 धावांनी मागे आहे आणि फक्त सहा विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत टीम इंडियासमोर फॉलोऑन वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भारतीय डावात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असताना पावसामुळे अनेकवेळा खेळ थांबवण्यात आला.
भारतीय डावाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला (04) मिचेल मार्शकरवी शॉर्ट मिडविकेटवर झेलबाद केले. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या पुढच्याच षटकात शुभमन गिल (01) हाही स्लिपमध्ये मार्शकडे झेलबाद झाला, तर हेझलवूडने उपाहारापूर्वी विराट कोहलीला (03) यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेलबाद करून भारताला तिसरा धक्का दिला.
त्यानंतर लगेचच 44 धावसंख्येवर कमिन्सने पंतला(09) यष्टिरक्षक कॅरीकडे झेलबाद करून भारताला चौथा धक्का दिला. त्यानंतर काही वेळ पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि नंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला. यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा तीन षटकेही पूर्ण होऊ शकली नाहीत आणि पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसामुळे पुन्हा सामना होऊ शकला नाही आणि पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल 33 धावांवर नाबाद परतला तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडलेले नव्हते.





