IND vs AUS 5TH T20 : श्रेयसची अर्धशतकी खेळी; ऑस्ट्रेलियासमोर 161 धावाचं आव्हान

India vs Australia 5th T20 Match Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत.
टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आजच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत आठ विकेट गमावत 160 धावा केल्या असून कांगारूंसमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
भारताकङून श्रेयस अय्यरने आपल्या T20 कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याने 37 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावा केल्या.
जितेश शर्माने 16 चेंडूत 24 आणि यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 21 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड 10 धावा करून, रिंकू सिंग सहा धावा करून, सूर्यकुमार यादव पाच धावा करून आणि रवी बिश्नोई दोन धावा करून बाद झाले. दोन धावा केल्यानंतर अर्शदीप नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डोर्सिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाला प्रत्येकी एक यश मिळाले.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये प्रथमच पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे, पण अंतिम सामना जिंकून त्यांना 4-1 असा फरक वाढवायचा आहे. भारतीय संघाने ही मालिका 4-1 ने जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 फॉरमॅटमध्ये सर्वात मोठ्या फरकाने हा मालिका विजय असेल.





