IND vs AUS 4th Test : स्मिथनं शतकी खेळीसह मोडला जो रूटचा मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज…

IND vs AUS 4th Test (Steve Smith) : भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथने 140 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकार मारले. याआधी स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतकाचा टप्पा ओलांडला होता. त्याचबरोबर या शतकी खेळीनंतर स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वास्तविक, स्टीव्ह स्मिथ हा भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत, स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या 23 कसोटी सामन्यांमध्ये 11 शतके आणि 10 वेळा पन्नास धावांचा टप्पा पार केला आहे. यासह स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जो रूटने भारताविरुद्धच्या 30 कसोटी सामन्यांमध्ये 10 शतके आणि 10 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
स्टीव्ह स्मिथ आणि जो रूटनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंगने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात 8 शतके झळकावली आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांनीही भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात 8 वेळा शतकी खेळी केली होती. तसेच, स्टीव्ह स्मिथ हा बॉक्सिंग डे कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
Steve Smith loves scoring big against India 💯 pic.twitter.com/2xCQpWRbOa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 27, 2024
स्टीव्ह स्मिथने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 10 शतके झळकावली आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 9 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे. तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रिकी पाँटिंगने 8 आणि मायकेल क्लार्कने 7 शतके झळकावली आहेत.
IND vs AUS 4th Test : कोहलीचा ज्याच्यासोबत झाला होता वाद; त्याच्या नावावर नोंदवला गेला विश्वविक्रम…
भारत 310 धावांनी पिछाडीवर…
दरम्यान, भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांना प्रत्युत्तरात भारताची धावसंख्या दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा झाल्या आहेत. अशाप्रकारे भारतीय संघ पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियापेक्षा 310 धावांनी मागे आहे.





