IND vs AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाची कमकुवत फलंदाजी भारतासाठी फायदेशीर – रवी शास्त्री

IND vs AUS 4th Test (Melbourne) | बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या बॉक्सिंग डे कसोटीला गुरुवार (26 डिसेंबर 2024) पासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत मालिकेमध्ये दोन्ही संघानी 1-1 अशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या कमकुवत असलेल्या फलंदाजीचा भारतीय गोलंदाजानी फायदा घेतला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमुळेच ही मालिका बरोबरीत असून बॉक्सिंग डे कसोटीत भारतच विजयाचा दावेदार असल्याचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री म्हणाले.
एका वृत्तपत्राशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले की, मालिका आता ज्या वळणावर आहे, भारताला याचा नक्कीच फायदा झाला आहे. पर्थ, ॲडलेड व ब्रिस्बेन या तीन ठिकाणी लढत झाल्यानंतरही पाहुणा संघ 1-1 अशी बरोबरी करत असेल तर भारतीय संघाने यातून नक्कीच प्रेरणा घ्यावी. त्यामुळे या लढतीत भारतीय संघ विश्वासाने मैदानात उतरेल, असे शास्त्री बोलताना म्हणाले.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लॅबुशेन यांचा समावेश असलेला ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी बुमराह समोर कमकुवत दिसून आली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला मॅकस्विनीला वगळून युवा सलामीवीर सॅम कोन्स्टासला पदार्पणाची संधी द्यावी लागली. यावर शास्त्री म्हणाले की, मला ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कमकुवत असल्याचे दिसून येत आहे, या परिस्थितीचा भारताने फायदा घेतला असून याचा भविष्यात देखील फायदा होईल, जसप्रीत बुमराहनेच भारताला या स्थितीत आणून ठेवल्याचे शास्त्री म्हणाले.
कमिन्सचा कॉन्स्टान्सला सल्ला…
सलामीवीर नॅथन मॅकस्वीनीच्या अपयशाने संघातून डच्चू मिळाल्यानंतर सॅम कॉन्स्टान्सला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला खेळात टिकून राहायचे असेल तर तुम्हाला खेळाचा पूर्ण आनंद घेता आला पाहिजे. तुम्ही जास्त विचार करून फायदा नाही. मी संघातील सर्वात नव्या खेळाडूला देखील हेच सांगतो आहे, मी पदार्पण केले तेव्हा मी केवळ 18 वर्षांचा होतो, तो 19 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला मी हा सल्ला दिल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला.





