IND vs AUS 2nd Test (Rohit Sharma) | ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. भारतीय कर्णधार म्हणून, सर्वाधिक सलग सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माचा समावेश झाला आहे. या बाबतीत त्याने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
खरे तर मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. 1967 ते 1968 या काळात त्यांना 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनला 1999 ते 2000 दरम्यान 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दत्ता गायकवाड यांना 1959 मध्ये चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
रोहितने केली कोहली-धोनीची बरोबरी…
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला 2011 आणि 2014 मध्ये सलग 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2020 ते 2021 दरम्यान 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 मध्ये सलग चार सामने गमावले आहेत.
भारतीय कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक पराभव…
मन्सूर अली खान पतौडी (1967-68) : 6 पराभव
सचिन तेंडुलकर (1999-00) : 5 पराभव
दत्ता गायकवाड (1959) : 4 पराभव
महेंद्रसिंग धोनी (2011 आणि 2014) : 4 पराभव
विराट कोहली (2020-21) : 4 पराभव
रोहित शर्मा (2024) : 4 पराभव
टीम इंडियाचा दारूण पराभव..
कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 180 धावा करता आल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 175 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य मिळाले, जे कांगारूंनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताचे विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसह टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरले.