IND vs AUS 2nd Test : अश्विनला द्यावी लागणार स्थानासाठी झुंज, अंतिम 11 साठी सुंदर फेव्हरेट

नवी दिल्ली – भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या नावावर ५३६ बळींची नोंद आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्याची दमदार कामगिरी आहे. असे असले तरी देखील अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जडेजा यांच्या संघातील उपस्थितीमुळे अश्विनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आगामी ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये दुसरा कसोटी लढतीला सुरुवात होणार आहे.
बॉर्डर – गावस्कर करंडक कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळविण्यात आला होता.
पर्थची खेळपट्टी ही उसळी घेणारी आणि वेगवान गोलंदाजांना मदत करणारी होती. पहिला डाव गडगल्यानंतर भारतीय फलंदाजानी दमदार खेळी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवले होते. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा व मोहम्मद सिराज या तीनही वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या चिथड्या उडविताना भारताला २९५ धावांनी विजय मिळवून दिला. या लढतीमध्ये खेळपट्टीचा अंदाज घेऊन अश्विनला वगळण्यात आले होते.
आगामी मालिकेत देखील, खेळपट्ट्या वेगवान आणि उसळी मारणाऱ्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्विनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळविणे खूप अवघड असणार आहे. न्यूझीलंड विरुद्धाच्या मालिकेमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भन्नाट गोलंदाजी करताना किवींना जेरीस आणले होते. त्याने पर्थ कसोटीत देखील चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे एक फिरकीपटूला संघात स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापन निश्चित सुंदरला प्राधान्य देणार आहे. किमान सुंदरची कामगिरी खराब झाल्यास अश्विनला स्थान मिळू शकते.
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते असलेले देवांग गांधी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, सध्याच्या संघ व्यवस्थापनाने खेळाडूंचा सध्याचा फॉर्म लक्ष्यात ठेवून प्रत्येकाकडे एक जबाबदारी दिली आहे. संघ व्यवस्थापनाला आत्मविश्वासाने भरलेला संघ मैदानात उतरवायचा होता. त्यामुळे मागील विक्रमांकडे संघ व्यवथापन लक्ष देत नसल्याचे गांधी म्हणाले. वॉशिंग्टन सुंदरने यापूर्वी देखील फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला आहे. त्यावर देखील गांधी म्हणाले, न्यूझीलंड विरुद्ध सुंदरने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही गोष्टी चांगल्याप्रकारे केल्या आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
ऍडलेडमधील अश्विनची चमक
२०२१ मध्ये ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीमध्ये अश्विनने चांगली कामगिरी केली होती. अश्विनने याच मैदानावर ५५ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले होते. असे असले तरी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अश्विनला तीन कसोटीमध्ये केवळ ९ बळी टिपता आले. या संदर्भात बोलताना गांधी म्हणाले, ऑस्ट्रेलियात भारताची मदार बुमराह, सिराज व हर्षित राणा यांच्यावरच आहे. शमीचा समावेश झाला तर यामध्ये तो देखील असले. ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाजांना विश्रांती देणे व धावगतीवर नियंत्रण ठेवणे हेच फिरकीपटूचे काम असल्याचे गांधी म्हणाले.
अश्विन, जडेजा आमनेसामने
अश्विनने परदेशात ४३ सामन्यांमध्ये ८३.७ च्या स्ट्राइक रेटने ७१ बळींची नोंद केली आहे. दुसरीकडे, जडेजाने ३५ सामन्यांमध्ये समान स्ट्राइक रेटने ५२ बळी टिपले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जडेजाला त्याच्या उत्तम फलंदाजी कौशल्यामुळे परदेशात अश्विनपेक्षा जास्त पसंती दिली जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जडेजाच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके तर अश्विनच्या नावावर केवळ दोन अर्धशतके आहेत.





