IND vs AFG Test : भारत-अफगाणिस्तान सामना ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’चा भाग नाही! नेमकं कारण काय? जाणून घ्या
IND vs AFG Test : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना डब्ल्यूटीसी सायकलचा का भाग नाही? जाणून घेऊया

IND vs AFG Test Match Not Part Of WTC Points Table : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव ऐतिहासिक कसोटी सामना शनिवार, ६ जूनपासून न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर सुरू होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची तयारी पूर्ण झाली असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र, या सामन्याबाबत एक तांत्रिक बाब समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. २०१९ पासून जगातील बहुतांश कसोटी सामने हे आयसीसीच्या ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’ अंतर्गत खेळवले जातात. पण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना डब्लूटीसीच्या गुणांशी संबंधित नसेल. या सामन्यातील हार-जीतचा आयसीसी डब्लूटीसीच्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही.
अफगाणिस्तानला टेस्ट दर्जा मिळूनही डब्ल्यूटीसी मधून का ठेवले बाहेर?
आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सध्या जगातील केवळ ९ सर्वोत्तम संघांचा समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानला २०१७ मध्येच कसोटी देशाचा अधिकृत दर्जा मिळाला असला, तरी आयसीसीने अद्याप त्यांना डब्लूटीसी खेळणाऱ्या मुख्य ९ संघांमध्ये स्थान दिलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, अफगाणिस्तानचा संघ वर्षभरात तितके कसोटी सामने खेळत नाही, जितके इतर देश खेळतात. अफगाणिस्तानप्रमाणेच झिम्बाब्वे आणि आयर्लंड या संघांनाही डब्लूटीसीच्या चक्रातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, २०२७ नंतर सुरू होणाऱ्या पुढील डब्लूटीसी सायकलमध्ये या संघांना सामावून घेण्याबाबत सध्या विचार सुरू आहे.
कमीत कमी २ सामन्यांची मालिका असणे अनिवार्य!
When IND last met AFG, it was more than just a Test match! ♥️
Swipe through the moments that made the IND vs AFG only Test in 2018 so memorable. 👀👉#INDvAFG Only Test 👉 Starts Sat, 6 June, 8:30 AM pic.twitter.com/dXqOgImIhT
— Star Sports (@StarSportsIndia) June 5, 2026
डब्लूटीसीच्या नियमांनुसार, या चॅम्पियनशिपचा भाग होण्यासाठी दोन देशांदरम्यान खेळवली जाणारी मालिका ही कमीत कमी २ कसोटी सामन्यांची असणे बंधनकारक आहे. परंतु, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान मुल्लानपूर येथे केवळ १ सामना (एकमेव कसोटी) खेळवला जाणार आहे. त्यामुळे हा केवळ एक द्विपक्षीय सामना मानला जाईल.
डब्लूटीसीच्या दृष्टीने भारताच्या गुणांवर या सामन्याचा कोणताही परिणाम होणार नसला, तरी खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा परिणाम आयसीसी रँकिंगवर नक्कीच होईल. या सामन्यातील कामगिरीवरून खेळाडूंची आयसीसी रेटिंग आणि क्रमवारी बदलेल.
९ वर्षात फक्त १२ कसोटी; इतिहास काय सांगतो?
अफगाणिस्तानला कसोटीचा दर्जा मिळून सुमारे ९ वर्षे झाली आहेत, मात्र या प्रदीर्घ काळात त्यांनी एकूण फक्त १२ कसोटी सामने खेळले आहेत. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजय नोंदवला होता. आता दुसऱ्या ऐतिहासिक लढतीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाला अफगाणिस्तान कसे आव्हान देते, हे पाहणे रंजक ठरेल.





