IND A vs NZ A : बुमराहला अवघी ६ षटके अन् जडेजाला चेंडूच मिळाला नाही! भारत ‘अ’ विरुद्ध न्यूझीलंड ‘अ’ अखेरचा कसोटी सामना अनिर्णित
IND A vs NZ A : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सराव कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या खराब हवामानामुळे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजासारख्या दिग्गज गोलंदाजांना सरावाची संधी मिळू शकली नाही.

India A vs New Zealand A 3rd Unofficial Test Match Drawn Due To Rain : भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तिसरा आणि अंतिम अनऑफिशियल कसोटी सामना मुसळधार पावसामुळे अनिर्णित (ड्रॉ) संपला. सततच्या पावसामुळे सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू फेकला जाऊ शकला नाही. तत्पूर्वी, भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात ५ बाद ४६४ धावांवर डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंड ‘अ’ संघ फलंदाजीला आला असता खराब हवामानामुळे केवळ १४ षटकांचाच खेळ होऊ शकला, ज्यामध्ये त्यांनी २ बाद ३६ धावा केल्या होत्या.
बुमराहला केवळ ६ षटके; गोलंदाजांच्या सरावाची संधी हुकली
१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि प्रसिध कृष्णा यांना लय मिळवण्यासाठी हा सामना सर्वोत्तम संधी होती. मात्र, पावसाने गोलंदाजांच्या सरावावर पूर्णपणे पाणी फेरले. बुमराहने संपूर्ण सामन्यात अवघी ६ षटके टाकून ११ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट्स मिळाली नाही. प्रसिध कृष्णाने ५ षटकांत १२ धावा देत २ गडी बाद केले, तर रवींद्र जडेजाला एकाही षटकाची गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे शतक; फलंदाजांचा दमदार सराव
गोलंदाजांची निराशा झाली असली, तरी भारतीय फलंदाजांसाठी हा सामना फायदेशीर ठरला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०७ धावांची तडाखेबंद शतकी खेळी साकारली. सुरुवातीच्या तीन डावांतील अपयशानंतर सलग दोन शतके ठोकत त्याने आपला फॉर्म सिद्ध केला आहे, जी टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली. याव्यतिरिक्त साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनीही या सराव सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा काढत उत्तम तयारी दर्शवली.
तिन्ही अनऑफिशियल सामने अनिर्णित; मालिका बरोबरीत समाप्त
भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तीन अनऑफिशियल कसोटी सामन्यांची ही मालिका पूर्णपणे अनिर्णित राहिली. लिंकन येथे खेळवला गेलेला पहिला सामना चार दिवसांनंतर ड्रॉ झाला होता. त्यानंतर क्राइस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हल मैदानावर झालेला दुसरा सामनाही अनिर्णित सुटला होता. आता पावसामुळे तिसरा सामनाही अनिर्णित राहिल्याने, या दौऱ्यातील तिन्ही सामन्यांचा निकाल लागू शकला नाही आणि मालिका बरोबरीत सुटली.





