Donald Trump : वाढीव आयात शुल्क आजपासून होणार लागू! ट्रम्प यांचे चीन, कॅनडा आणि मेक्सिकोसाठी आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडावर वाढीव आयात शुल्क लावण्याचे जे आदेश दिले आहेत, त्यांची अंमलबजावणी आज (शनिवार) पासून सुरू होणार आहे. अमेरिकेत बेकायदेशीर फेंटॅनिल मिळवून वितरित करण्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के तसेच चीनवर १० टक्के कर लावणार आहेत, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ब्रीफिंग रूममध्ये पत्रकारांना सांगितले.
बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत फेंटॅनिल पोचवल्यामुळे अमेरिकेतल्या लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. काही माध्यमांनी १ मार्चपासून आयात शुल्क आकारले जाणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले आणि ट्रम्प १ फेब्रुवारीपासून या देशांवर शुल्क लादण्याची योजना आखत आहेत, असे स्पष्ट केले. कॅनडा आणि मेक्सिकोवरील वाढीव आयात शुल्काची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासूनच करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले आहे.
कॅनडावर वाढीव आयात शुल्क लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला जोरदार प्रतिकार करण्यात येईल, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे. जर ट्रम्प यांनी कॅनडाविरुद्ध कोणतेही शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही एक उद्देशपूर्ण, सक्तीचा परंतु वाजवी, तात्काळ प्रतिसाद देण्यास तयार आहोत, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. या वाढीव आयात शुल्कामुळे केवळ कॅनडाचे नुकसान होईल, असे नाही. तर अमेरिकेच्याही अर्थकारणाचेही नुकसान होईल. तसेच दोन्ही देशांच्या एकत्रित सुरक्षेलाही ते बाधक असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
कॅनडाबरोबर व्यापार करणे हे अमेरिकेसाठी दीर्घकाळाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. कॅनडाचे स्टील आणि ॲल्युमिनियम, महत्त्वाची खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा, तसेच त्याच्या स्थिर लोकशाही संस्था, सामायिक मूल्ये आणि जगातील सर्वोत्तम कामगार हे अमेरिकेच्या फायद्याचेच आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.





