GBS Pune : जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ; पाच नव्या रुग्णांची भर, ४७ रुग्णांना डिस्चार्ज

पुणेः जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळायला सुरूवात झाली. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागात या आजाराचे संशियत रुग्ण आढळून येत आहे. आत्तापर्यंत या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पुण्यात पाच संशयित रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे.
यामुळे रुग्णसंख्या १६३ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत या आजारातून ४७ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. तर काही रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
वाढत्या जीबीएसमुळे इतरही कारणांचा शोध
आयसीयूमध्ये असणाऱ्या ४७ रूग्णांपैकी २१ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएस आजाराची लागण ही दूषित पाणी आणि शिळ्या अन्नाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वाढत्या जीबीएस आजाराच्या इतरही कारणांचा शोध घेण्यात येत आहे. विविध पक्षी, पोल्ट्रीफॅार्म आणि मातीचे सँपल घेऊन हा आजारा नेमका कशामुळे वाढत आहे, याबाबत संशोधन करण्यात येत आहे. पुणे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध पथकांच्या माध्यमातून पाण्याचे नमुन्यांचे देखील संकलन केले जात आहे.
कुठे किती रुग्ण?
महापालिका क्षेत्रात ३२ रुग्ण, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात ८६ रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १८ रुग्ण, पुणे ग्रामीण भागात १९ रुग्ण, इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण मिळूण १६३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ४७ रुग्ण हे या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.





