nagar | शनिशिंगणापूरला भाविकांच्या गर्दीत वाढ

शनिशिंगणापूर, (वार्ताहर) – शाळांना उन्हाळी सुट्टी असून सुद्धा प्रचंड उन्हामुळे शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे वातावरणामध्ये बदल झाल्याने शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.
शनिवारी, रविवारी व सोमवारी सुट्टी आल्याने शिंगणापूर येथील वाहनतळ गर्दीने फुलले आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण फुलले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा अत्यंत वाढल्याने शाळांना उन्हाळी सुट्टी असून सुद्धा शनिशिंगणापूरकडे भाविकांनी पाठ फिरवली होती.उन्हाची प्रचंड तीव्रता व दमट हवामान यामुळे भाविकांचा ओघ बऱ्याचशा प्रमाणात घटला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे शनिशिंगणापूरला येणारे भाविक कुठेही न थांबता काढता पाय घेत असल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले होते.
त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतरच भाविक शनिशिंगणापूरला वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, वळवाच्या पावसाने वातावरणामध्ये बदल होऊन ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला. वातावरणातील बदलाच्या या खेळामध्ये भाविकही शनिशिंगणापूरला येऊ लागले. शिंगणापूरमधील रस्ते गर्दीने फुलून गेले. शनिश्वर देवस्थान ट्रस्टकडून भाविकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे





