वाई – वाई नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून वाढलेली लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता, यावर्षी नगरसेवकांची संख्या २० वरून २३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वीच्या १० प्रभागांची पुनर्रचना करून आता ११ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या बदलांमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत उद्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मंत्रालयात काढली जाणार आहे. त्यानंतर, नगरसेवक पदांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी वाई नगरपालिका कार्यालयात पार पडेल. या सोडतीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार उभा राहणार, याची निश्चिती होईल. वाई शहराची लोकसंख्या आता सुमारे ४५ हजारांच्या घरात पोहोचली असून, मतदारांची संख्या ३६ ते ३८ हजारांच्या दरम्यान आहे. वाढलेली मतदार संख्या आणि नवीन प्रभाग रचनेमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुकांनी आतापासूनच आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवला असून, बैठका आणि गट-तटांच्या राजकारणाला वेग आला आहे. ही निवडणूक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपचे नेते मदन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सौ. अरुणादेवी पिसाळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांची या निवडणुकीतील भूमिका महत्वाची ठरणार आहे. वाई हा मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना वाई शहरातून मिळालेले लक्षणीय मताधिक्य पाहता नगरपालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि गट सज्ज झाले आहेत. त्यांच्या विकासकामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जातील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राज्य पातळीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती असली तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही युती कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्था निक पातळीवरील समीकरणे आणि नेत्यांमधील संबंध पाहता, निवडणुकीत अनपेक्षित आघाड्या किंवा स्वतंत्र लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काळात वाईतील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे दिसत आहे.