केंद्र सरकारचा मोठा निर्णय..! सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. यामध्ये गव्हाच्या सध्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल १६० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ही वाढ मंजूर करण्यात आली आहे.
सरकारने रब्बी पिकांची २०२६-२७ च्या हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असून, त्याची किंमत २,५८५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. हा निर्णय कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे.
गहू खरेदीचा २०२६-२७ चा विपणन हंगाम एप्रिलमध्ये सुरू होईल, तर मोठा भाग जूनपर्यंत पूर्ण होईल. या सहा रब्बी पिकांमध्ये गहू, ज्वारी, बार्ली, हरभरा आणि मसूर यांचा समावेश आहे. तसेच किमान आधारभूत किमतीमध्ये सर्वाधिक वाढ ही करडईसाठी प्रति क्विंटल ६०० रुपये करण्यात आली आहे.
त्यानंतर मसूरसाठी प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मोहरी, हरभरा आणि बार्ली या पिकांसाठी अनुक्रमे प्रति क्विंटल २५० रुपये, २२५ रुपये आणि १७० रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.





