Electric vehicles : वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे नवीन वीजजोडणीत वाढ
Electric vehicles : स्वतंत्र ईव्ही चार्जिंग वीजजोडणीची सुरूवात

Electric vehicles : पिंपरी-चिंचवडमध्ये इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून शहरातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ‘महावितरण’ने ईव्ही चार्जिंगसाठी स्वतंत्र वीजजोडणीचा पर्याय अगोदरच उपलब्ध करून दिला होता.
नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील बहुतांश ईव्हीधारक आपली वाहने घरगुती, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वीजजोडणीवरूनच चार्ज करत होते.
परिणामी, वीज बिलाचा ‘स्लॅब’ बदलून ग्राहक अधिक दराच्या श्रेणीत जात होते. वाढीव स्लॅबला वाढीव वीजदर लागू होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा ‘शॉक’ बसत होता. अनेक ग्राहकांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या. याची दखल घेत महावितरणाने स्वतंत्र ईव्ही चार्जिंग वीजजोडणीची सुरूवात केली.
महावितरणच्या पिंपरी-चिंचवड उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या मीटरसोबतच आणखी एक स्वतंत्र मीटर बसवून घेता येणार आहे. आतापर्यंत ५ हजार ९४ नागरिकांनी स्वतंत्र जोडणी घेतली आहे. या नव्या जोडणीचा वापर केवळ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठीच करावा लागेल.
विशेष म्हणजे, या स्वतंत्र जोडणीला निश्चित वीजदर आकारला जाणार आहे. आता स्वतंत्र जोडणीमुळे हा अतिरिक्त भार वेगळा राहणार असून, ग्राहकांची बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या हजारो ईव्ही रस्त्यावर आहेत.
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहनासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. नव्या धोरणामुळे शहरातील गृहनिर्माण संस्था आणि बंगलो परिसरात राहणाऱ्या ईव्हीधारकांना मोठा लाभ होईल. स्वतंत्र जोडणीसाठी ग्राहकांना महावितरणच्या स्थानिक कार्यालयात किंवा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
School Stationery Price Hike: शालेय साहित्य खरेदीला दरवाढीची झळ





