देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवा

पुण्यातील “एएफएमसी’ने व्यक्त केली गरज
पुणे – देशात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि तुलनेत उपलब्ध वैद्यकीय संसाधनांची तुरळक उपलब्धता लक्षात घेता, देशातील लॉकडाऊन कालावधी 30 जूनपर्यंत वाढवावा, अशी गरज लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाने (एएफएमसी) प्रकाशित अभ्यासात व्यक्त केली आहे.
पुण्यातील एएफएमसी आणि मुंबई येथील नौदल रुग्णालय असलेल्या आयएनएस अश्विनी यांच्यातर्फे करण्यात आलेला “मॅथेमॅटिक्स मॉडेलिंग ऑफ पोस्ट लॉकडाऊन’ या संयुक्त अभ्यासात हा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि करोनावर योग्य लस उपलब्ध न झाल्यास हा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविणे अनिवार्य असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. या अभ्यासात आयएनएस अश्विनीतर्फे डॉ. कौस्तुभ चॅटर्जी, एएफएमसीतर्फे डॉ. कौशिक चॅटर्जी, डॉ. अरुण यादव आणि डॉ. शंकर सुब्रह्मण्यम हे सहभागी होते.
या अभ्यासानुसार, देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना म्हटले आहे की, राज्यात प्रति 1000 व्यक्तिमागे केवळ 184 रुग्ण भरती क्षमता आणि 70 आयसीयू उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय संसाधनांची संख्याही अतीशय कमी आहे. त्यामुळे कमीत कमी नागरिक या आजाराने बाधित होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या औषधाची कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय असून, त्यामुळे देशातील लॉकडाउन कालावधी तूर्तास 30 जूनपर्यंत वाढविण्यात यावा, असे या अभ्यासात सांगितले आहे.





