अनाकलनीय यंत्रभाषा

– हिमांशू
स्टेनोग्राफी अर्थात लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडची गरज काळाबरोबर हळूहळू कमी झाली. सध्याच्या उत्तर आधुनिक काळात तर हळूहळू सगळ्या प्रणाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य तंत्रज्ञानांनी काबीज करायला सुरुवात केली आहे.
एखाद्या एआय प्रणालीला दिलेली सूचना तिने पाळली आणि दुसर्या प्रणालीशी संपर्क साधला, तर दुसरी प्रणाली पलीकडील व्यक्तीला योग्य तो संदेश पोहोचवते. अर्थात, तो मानवी भाषेत असतो. समजा, या दोन प्रणालींनी परस्परांशी संवाद साधताना लघुलिपीसारख्या एखाद्या भाषेचा वापर केला तर? या प्रणाली काय बोलतात, ते दोन्हीकडच्या माणसांना समजणं शक्य नाही.
या अंतर्गत यांत्रिक संवादालाच ‘गिबरलिंक मोड’ असं नाव दिलं गेलंय. दोन एआय प्रणालींचे ‘व्हॉइस एजंट्स’ परस्परांशी ‘यांत्रिक भाषेत’ बोलतात, जेणेकरून कमी वेळात काम पूर्ण व्हावं. ही ‘गुप्त भाषा’ माणसांच्या आकलनशक्तीच्या बाहेरची आहे. एकतर ती कमालीची वेगवान आहे. दोन प्रणालींच्या स्क्रीनवर काही ग्राफिक्स दिसतात आणि पार्श्वभूमीला विशिष्ट गतिमान ध्वनी ऐकू येतात.
दोन उपकरणांमधील संवादाला वेग यावा म्हणून हा मोड डिझाइन करण्यात आला आहे. मुळातच वेगात होणारं काम आणखी वेगात होत असेल तर अनेकांना याविषयी धास्ती का वाटते? त्याचं कारण म्हणजे स्वतःची भाषा विकसित करण्याची एआयकडे असणारी क्षमता. इथेच जोखमीची सुरुवात होते. संवादात पारदर्शकता नसेल, तर माणसांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्यातून मोठमोठ्या चुका घडतात, हा इतिहास आहे. ही तर यंत्रं आहेत. त्यांच्यात ‘कम्युनिकेशन गॅप’ राहणं किंवा त्यांनी स्वतःची भाषा उन्नत करून मूळ भाषेचं वळण बदलणं ही नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण माणसांना न समजणारा हा ‘कस्टम प्रोटोकॉल’ आहे.
एआय प्रणाली पूर्णपणे स्वायत्त असते. कधी-कधी ती आपल्याला संभ्रमात टाकणार्या गोष्टीही करू शकते. एआय प्रणालींची जी उन्नत मॉडेल्स आहेत, त्यांनी बुद्धिबळाच्या खेळात ‘चीटिंग’ केल्याची उदाहरणं आहेत. पराभवापासून बचाव करण्यासाठी प्रतिस्पर्धी प्रणालीचा संपूर्ण गेम सेटअप बदलून फसवलं आहे. एआयने स्वतःची भाषा विकसित करणं आणि गिबरलिंक मोडमध्ये बदल करणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधतात. उद्याचा माणूस जेव्हा यंत्रांच्या गराड्यात असेल तेव्हा भाषा समजत नसलेल्या देशात आल्याचा भास त्याला होऊ नये, इतकंच!





