माजी मंत्र्यांच्या लेकासह अनेकांचा भाजपात प्रवेश; काँग्रेसमधून 2 मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचा बावनकुळेंचा दावा

Chandrashekhar bawankule | भारतीय जनता पक्षात मागील काही दिवसांपासून अनेकांनी प्रवेश केल्याचे पाहायला मिळत आहे. सातत्याने इनकमिंग सुरू असल्याने भाजपची ताकदही वाढत आहे.
यातच मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मालेगाव येथील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे, श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फड यांचा भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश झाला.
भाजपमधील पक्षप्रवेशावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये 7 वर्षे मंत्री राहिलेल्या बळीराम हिरे यांच्या परिवारातील प्रशांत हिरे यांचा आज भाजपात प्रवेश झाला आहे. मालेगावातील हिरे कुटुंब यांचं राजकीय क्षेत्रात मोठं योगदान आहे. याशिवाय कोल्हापूरमधील माजी आमदार संजय घाडगे हेही भाजपात आले आहेत. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसमधील 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे मी पक्षात स्वागत आणि अभिनंद करतो.’
काँग्रेसमधून 2 मोठे पक्षप्रवेश होणार
इतकेच काय तर पुढील काळात काँग्रेसमधून 2 मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील यावेळी बावनकुळे यांनी दिली. “महाविकास आघाडीला हे मोठं खिंडार आहे, अजून काही पक्षप्रवेश मेळाव्यादरम्यान होतील. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे राजकारण घराघरात भांडणं लावणे, परिवार तोडणे याआधारावर आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे कधीही राजकारण त्यांनी केलं नाही. मोदीजी आणि देवेंद्रजींनी विकासाचा संकल्प केला. काही लोकं अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे जात आहेत, कारण विकासाचे राजकारण होत आहे,” असेही बावनकुळे यांनी म्हटले.
प्रसाद हिरेंची भाजपवासी
दरम्यान, गेले काही दिवस प्रसाद हिरे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा मालेगाव येथे घेतला होता. यावेळी काँग्रेस पक्षाविषयी असलेली सध्याची स्थिती आणि राजकारणाचा कल यासंदर्भात समर्थकांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. वेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा संकेत दिला होता. त्यानुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
2004 मध्ये प्रसाद हिरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते पुन्हा स्वगृही काँग्रेस पक्षात परतले होते. आता पुन्हा यू टर्न घेत त्यांनी भाजपवासी केली आहे.
हेही वाचा :
सोन्याचा चमचा अन् पानाला चुना: गुलाबराव पाटील रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक, नेमकं काय म्हणाले?





