Rakul Preet Singh : बॉलिवूड हादरलं.! अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाचा छापा; वासू भगनानी यांच्यासह अनेक कलाकार रडावर, सिनेमांच्या आड पैशांचा खेळ उघड?
चित्रपट निर्मिती, परदेशातील वितरण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कथित करचुकवेगिरीच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

Rakul Preet Singh : बॉलिवूडमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाशु भगनानी आणि पॅनोरामा स्टुडिओसह तब्बल 12 ठिकाणी आयकर विभागाच्या पथकांकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपट निर्मिती, परदेशातील वितरण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कथित करचुकवेगिरीच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे सध्या बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आयकर विभागाच्या विविध पथकांनी सोमवारी अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाई सुरू केली. चित्रपटांचे चित्रीकरण, परदेशातील वितरण, निर्मिती खर्च आणि इतर व्यवहारांच्या नावाखाली परदेशात मोठ्या प्रमाणावर पैसे हस्तांतरित केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाल्याचे सांगितले जात आहे.
आयकर विभागाकडून या ठिकाणी आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, व्यवहारांची नोंद, प्रॉडक्शनशी संबंधित आर्थिक माहिती आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कारवाईत नेमके काय आढळले किंवा कोणती कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
रकुल प्रीत सिंगचं नाव का चर्चेत?
या कारवाईमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या घराचाही समावेश असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. रकुल प्रीत सिंगने हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून, गेल्या काही वर्षांत तिने बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे, वाशु भगनानी हे रकुल प्रीत सिंगचे सासरे आहेत. रकुलने वाशु भगनानी यांचा मुलगा, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जॅकी भगनानी याच्यासोबत 2024 मध्ये विवाह केला. गोवा येथे या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यामुळे आयकर विभागाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रकुल प्रीत सिंग आणि भगनानी कुटुंबाचं नाव एकाच वेळी चर्चेत आलं आहे.
वाशु भगनानी कोण आहेत?
वाशु भगनानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते असून त्यांनी पूजा एंटरटेनमेंट या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या निर्मिती संस्थेने बॉलिवूडमधील विविध मोठ्या प्रकल्पांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर झालेल्या आयकर विभागाच्या कारवाईकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
पॅनोरामा स्टुडिओही तपासाच्या कक्षेत
पॅनोरामा स्टुडिओ हे देखील भारतीय चित्रपटसृष्टीतील चर्चेतील नाव आहे. विशेषतः ‘दृश्यम’ फ्रँचायझीशी संबंधित असल्याने या कंपनीची चित्रपट क्षेत्रात महत्त्वाची ओळख आहे. आयकर विभागाच्या कारवाईमध्ये पॅनोरामा स्टुडिओचा समावेश असल्याची माहिती समोर आल्यानंतर या कारवाईचा आवाका किती मोठा आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.







