Indrayani Ghat : इंद्रायणी घाटावर वाढताहेत गैरप्रकार; धिंगाणा आणि व्यसनांच्या प्रकारांवर नियंत्रणाची मागणी
Indrayani Ghat : सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखली गेली पाहिजे

देहूगाव – श्री संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीतील इंद्रायणी नदी घाटावर काही तरुण-तरुणींकडून गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सायंकाळनंतर घाट परिसरात जोडप्यांचा वावर वाढत असून, काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे, मोठ्या आवाजात आरडाओरड आणि धिंगाणा सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी गांजा आणि मद्यसेवन होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे घाटाचे धार्मिक वातावरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देहू हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इंद्रायणी नदीचे दर्शन घेण्यासाठी तसेच धार्मिक विधी करण्यासाठी येथे दररोज भाविक आणि वारकरी येतात. स्थानिक नागरिकही सकाळी व सायंकाळी घाटावर फेरफटका मारण्यासाठी, योगाभ्यास आणि व्यायामासाठी येतात. मात्र काही व्यक्तींच्या बेशिस्त वर्तनामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावाबाहेरून येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्याही वाढत आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत काही जोडपी आणि त्यांचे मित्र घाट परिसरात थांबून असतात. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली मोठ्या आवाजात आरडाओरड आणि धिंगाणा घातला जात असल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळे घाटावरील शांतता आणि धार्मिक वातावरण बाधित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यामुळे घाट परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गरजेनुसार साध्या वेशातील पोलिसांची गस्त ठेवावी. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर आणि व्यसनांच्या प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
व्यसनांच्या प्रकारांबाबत तक्रारी
घाट परिसरातील काही आडोशाच्या ठिकाणी गांजा, सिगारेट आणि मद्यसेवन केले जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. धार्मिक महत्त्व असलेल्या परिसरात असे प्रकार घडत असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या तक्रारींची अधिकृत पडताळणी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी परिसराची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
इंद्रायणी घाट हा सर्वांसाठी खुला सार्वजनिक परिसर आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक येथे नियमितपणे येतात. मात्र काही जणांच्या वर्तनामुळे त्यांना संकोचजनक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखली गेली पाहिजे. घाटावर येणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





