Beed Crime News : बीडमध्ये पुन्हा कोयत्याचा कहर! साठे चौकात दोन गटात झटापट, दोघांवर हल्ला

Beed Crime News : बीड शहरात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. बुधवारी (४ जून) रात्री आठच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या साठे चौकात दोन गटांमध्ये वाद होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
सकाळ-संध्याकाळ वाहतुकीने फुललेल्या साठे चौक परिसरात फक्त हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून एक पिकअप चालक आणि बुलेटस्वारांमध्ये वाद झाला. क्षुल्लक वादाने पेट घेतला आणि त्याचे रूप मोठ्या मारामारीत बदलले. अचानकपणे जवळच नारळ विक्री करणाऱ्या स्टॉलवरील कोयता आणि चाकू घेऊन एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला.
हल्लेखोरांनी दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा बीड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला असून, यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाला वेग दिला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.





