Satara: ‘यशोदा’मध्ये तीन अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन
Satara विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच त्यांच्यामध्ये संशोधन, नवोपक्रम आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

Satara: अभियांत्रिकी शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्याच्या उद्देशाने यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे अभियांत्रिकी दिनानिमित्त ईप्लॅन सेंटर ऑफ एक्सलन्स, मायक्रोचिप सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इलेक्ट्रिक व्हेईकल प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच त्यांच्यामध्ये संशोधन, नवोपक्रम आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. ईप्लॅन सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ईप्लॅन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण मिळणार आहे. मायक्रोचिप सेंटर ऑफ एक्सलन्स हे सेमीकंडक्टर, अॅम्बेडेड सिस्टिम्स, मायक्रोकंट्रोलर्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल प्रयोगशाळेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक ड्राइव्ह, ऊर्जा व्यवस्थापन आणि शाश्वत वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग आणि संशोधनाची संधी मिळणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गोडसे म्हणाले, सायबर सिक्युरिटी, क्वांटम कॉम्प्युटिंग, डेटा सिक्युरिटी, डेटा कायदे आणि सेमीकंडक्टर यांसारखी क्षेत्रे भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.
प्रा. डॉ. अजिंक्य सगरे म्हणाले, यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेली ईप्लॅन सेंटर ऑफ एक्सलन्स, मायक्रोचिप सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इलेक्ट्रिक व्हेईकल प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची पावले आहेत.
या उपक्रमासाठी ईप्लॅनचे मुकुंद कुलकर्णी, एसएसआयजीएमएचे सुदर्शन लाटकर आणि अडुस्किल्सचे बिबेक रंजन यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल यशोदा टेक्निकल कॅम्पसच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी नीतेश मोरे, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. विक्रम पाटील, डॉ. रणधीरसिंह मोहिते, डॉ. प्रकाश जाधव,डॉ. विठ्ठल चवरे डॉ. मृणालिनी जाधव ,विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते. . डॉ. तरंग शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सरिता बलशेटवार यांनी आभार मानले.





