पुणे जिल्हा | जुन्नर वन विभागाच्या वेबसाईट व प्रोमो फिल्मचे उद्घाटन

मंचर, (प्रतिनिधी) – जुन्नर वन विभागाने साकारलेला हा उपक्रम नागरिकांना, पर्यटकांना उपयोगी आहेच याशिवाय वनविभागाचे खडतर कार्य नव्याने लोकांपर्यंत पोचवण्यात देखील यातून मदत होईल.
विभागाचे अनेक लोकोपयोगी उपक्रम व बिबट्याविषयी शास्त्रीय माहितीसह प्रबोधनाचे कार्य यातून सुलभ होऊ शकेल असे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.
जुन्नर वन विभागाच्या वेबसाईट (www.junnarforest.in) आणि प्रोमो फिल्मचे उद्घाटन वन्यजीव सप्ताहानिमित्त सोमवार, दि. ७ रोजी पुण्यातील वनभवन येथे पार पडले. मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या अभिनव प्रकल्पाचे प्रात्यक्षिक उपस्थितांना देण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून तुषार चव्हाण, महादेव मोहिते, कुशाग्र पाठक हे वनाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना अमोल सातपुते म्हणाले,जुन्नर वनविभागाची व्याप्ती पाहता सर्व माहितीचे डिजिटल पॉकेट आम्हाला या निमित्ताने करता आले. शिवाय येणाऱ्या पर्यटकांचे उत्तम नियोजन करण्यासाठी आम्ही यात अनेक डिजिटल बाबी अंतर्भूत केल्या आहेत.
जुन्नर विभागातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे आणि वन्यजीवन हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचे विषय आहेत. ही वेबसाईट आणि प्रोमो फिल्म या वैभवाची जागतिक पातळीवर ओळख करून देणार आहेत.
वेबसाईट व प्रामो फिल्म बनवणारे सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीजचे एमडी सुनील चोरे म्हणाले, ४ मिनिटाच्या महाराष्ट्र गीतावर सजवलेले जुन्नरचे चित्रीकरण व त्यात सामावलेली इथल्या अभिजात वारशांची संक्षिप्त माहिती सोशल मीडियामुळे घराघरात पोचेल,
यातून अनेक नवीन पर्यटक जुन्नरशी जोडले जातील. जुन्नर वन विभागाच्या तर्फे सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. तर सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी आभार मानले.





