तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन डॉ. केशव बाळाजी हेडगेवार भवनाचे उद्घाटन शनिवारी (दि.१८) उत्साहात पार पडले. या सोहळ्यास राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजीमंत्री संजय भेगडे, स्वाभिमानी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, आमदार शंकर मांडेकर, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, रुपलेखा ढोरे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, सहकार भूषण बबन भेगडे, उद्योजक शंकर शेळके, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, कृष्णा कारके, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, यादवेंद्र खळदे, सरसेनापती दाभाडे परिवारातील वंशज व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, नियोजनबद्ध आणि पारदर्शक काम केल्यास शासनाचा मोठा निधी उपलब्ध होतो आणि त्यातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास शक्य होतो. आमदार सुनील शेळके यांनी मावळचा कायापालट करून हे सिद्ध केले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून प्राधान्य देण्यात येईल.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री संजय भेगडे यांना एकत्र येऊन मावळच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. त्यावर भेगडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, मावळच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करण्यास तयार आहोत, असे नमूद केले. या संवादामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय सलोख्याचे नवीन पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नगरपरिषद इमारतीचे बांधकाम जलदगतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले. या कार्याबद्दल त्यांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विशेष नागरी सत्कार करण्यात आला.




