Pune District : बेल्हेत 500 मेट्रिक टन धान्य गोदामाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
Pune District : बेल्हे येथे उभारण्यात आलेल्या या आधुनिक धान्य गोदामामुळे परिसरातील शेतकर्यांना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

बेल्हे : आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ’जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना’ व कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
यावेळी नाबार्ड पुणे विभागाचे सरव्यवस्थापक अविनाश सेवळकर, व्यवस्थापक प्रणित राज, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक गिरीश जाधव, शेती कर्ज विभागाचे श्री. माळी, संस्था सक्षमीकरण समन्वयक रमेश बांडे, बँकेचे संचालक ड. संजयराव काळे, जुन्नरचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) डॉ. गजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास औटी यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेल्हे येथे उभारण्यात आलेल्या या आधुनिक धान्य गोदामामुळे परिसरातील शेतकर्यांना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, दर्जेदार साठवण, प्रभावी विपणन आणि सहकारी संस्थेच्या व्यवसायवृद्धीला चालना मिळणार असून शेतकर्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या विविध राष्ट्रीय उपक्रमांचेही दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये देशभरातील 232 धान्य गोदामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय बीज सहकारी समिती यांच्यातील केळी टिश्यू कल्चर प्रयोगशाळेसंदर्भातील सामंजस्य करार, राष्ट्रीय सहकारी डेटाबेस (छउऊ) पोर्टल 3.0, एनडीडीबी दुग्ध सहकारी समीक्षा डॅशबोर्ड, तसेच विविध राष्ट्रीय बहुराज्य सहकारी संस्थांच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.





