पुणे : रसिकांना ‘पिफ’ची पर्वणी दि.3 मार्चपासून; ‘या’ मराठी चित्रपटांचा समावेश

पुणे- 20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन 3 मार्च रोजी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित “पिफ’ची माहिती संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिफचे क्रिएटिव्ह डायरेक्टर समर नखाते, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, मेघराज राजेभोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी आदी उपस्थित होते. स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या “नेबर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सुरूवात शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे आणि यशवंत जाधव हे सादरीकरण करतील.
या मराठी चित्रपटांचा समावेश
महोत्सवाच्या मराठी विभागात “आता वेळ झाली’, “गोदावरी’, “मीडियम स्पायसी’, “निवास’, “एकदा काय झाले’, “पोटरा’, “तिचं शहर होणं’ या चित्रपटांचा समावेश आहे. तर प्रीमिअर होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये “वर्तूळ’, “अवकाश’, “इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी’, “जननी’, “राख – सायलेंट फिल्म’, “रंगांध’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.
“एनएफएआय’मध्ये कार्यक्रमांचे आयोजन
दि. 4 ते 10 मार्चदरम्यान एनएफएआयमध्ये “चित्रांजली’ या भित्तीचित्रे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन स्वातंत्र्य सैनिक, युद्ध वीर या थीमवर आधारित आहे. यासह सध्या नामशेष होत असणाऱ्या 35 एमएम या फॉरमॅटमध्ये सत्यजित रे यांचे “अगंतुक’, “देवी’ आणि “जलसागर’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यासह भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीत “गुळाचा गणपती’ आणि साहीर लुधियानवी यांच्या स्मृतीत “प्यासा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून “एनएफएआय’मध्ये झालेल्या संशोधनांवर आधारित कानडी सिने दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
या विशेष कार्यक्रमांचे आयोजन
दि. 5 : विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात “साहिर लुधियानवी आणि त्यांचे लेखन’ विषयावर जावेद अख्तर यांचे व्याख्यान
दि. 6 : ओम भुतकर यांचा उर्दू कविता आणि साहित्यावर आधारित “सुखन’ हा कार्यक्रम
दि. 7 : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि डॉन स्टुडिओतर्फे “साऊंड इन फिल्म्स’ विषयावर कार्यशाळा
दि. 8 : “सत्यजित रे आणि त्यांचा सिनेमा’ विषयावरील परिसंवादात धृतिमान चॅटर्जी, डॉ. मोहन आगाशे आणि रवी गुप्ता आदी दिग्गजांचा सहभाग.





