Inapur News | पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – राजू शेट्टींची मागणी

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – राज्यातील पूरग्रस्त अतिवृष्टी ग्रस्त भागातील नुकसानीची सरसकट भरपाई द्या, असे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले.इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे कृषिमंत्री भरणे यांची भेट राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या शिष्ट मंडळासह गुरुवारी (दि. 28) घेतली.
यावेळी मागण्यांचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. तसेच राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नावर, राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री भरणे यांच्यासोबत चर्चा केली. निवेदनात माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे, राज्यामध्ये महापूर व अतिवृष्टीने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेक भागामध्ये जमीनी खरडून गेल्या असून, पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागामध्ये दिवसात जवळपास 300 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.केंद्र सरकारचे आयात निर्यात चे बदलते धोरण, गडगडलेले बाजारभाव यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील पुरगस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाईची मदत जाहीर करावी. अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेली आहे.
पंचनारमे करण्यासाठी पिकेच शिल्लक नाहीत..
राज्यातील सर्वाधिक नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना फटका बसला आहे. वरील जिल्यातील कापूस, सोयाबीन, उडीद, मका मूग, फळबाग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
नदी व ओढयां कडेला असणा-या जमीनीतील पिके पंचनामे करण्यासाठी शिल्लक राहिलेली नाहीत. मुळातच खते बियाणे व किटकनाशके, तणनाशके, औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजूरी बरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे.





