वाघोलीमध्ये ग्रामस्थांनी वाहतूक कोंडी सोबत खड्डे बुजवण्यात घेतला पुढाकार

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील सततची होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार उल्लेखनीय असून याबरोबरच पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने नगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम देखील होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे नगर रस्त्यावर वाघोली हद्दीमध्ये रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असताना यातून मार्ग काढण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे यांनी पाठपुरावा करून गेल्या चार ते पाच दिवसात रात्री अप रात्री पुणे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्यात मोठा हातभार लावला आहे.
वाहतूक नियंत्रण समितीचे सदस्य सनी अन्सारी, गणेश तांबे, सतपाल सातव पाटील आदी ग्रामस्थ वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मदत करत असून मदत करणाऱ्या या सर्वांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. वाघोलीतील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याने वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. सतत होणाऱ्या पावसात देखील वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत करणाऱ्या संपत गाडे यांचा पावसात भिजलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.





