नवी दिल्ली: बॉलिवूड चित्रपट ‘स्पेशल 26’ मधून प्रेरणा घेऊन दिल्लीतील करोल बाग येथे ज्वेलरी वर्कशॉपवर बनावट रेड टाकून १ किलोपेक्षा अधिक सोनं लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत पकडण्यात यश मिळवलं आहे. या थरारक आंतरराज्य पाठलागात पोलिसांनी सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास करून ५ आरोपींना अटक केली आहे. फिल्मी स्टाईल लूट: २७ नोव्हेंबर २०२५ रोजी करोल बाग येथील एका ज्वेलरी वर्कशॉपमध्ये ही घटना घडली. पाच आरोपींनी या वर्कशॉपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी एकाने पोलिसांची वर्दी परिधान केली होती, तर उर्वरित चार जण इन्कम टॅक्स अधिकारी बनून आले होते. त्यांनी बनावट तपासणीचे नाटक करत, वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त केले आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआरही काढून टाकले. त्यानंतर सुमारे १ किलोग्रामपेक्षा जास्त सोनं घेऊन तेथून पसार झाले. या घटनेनंतर प्रसाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १२०० KM चा पाठलाग, ७२ तासांत जेरबंद: या घटनेने दिल्ली पोलिसांनाही धक्का बसला. सेंट्रल जिल्हा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी Brezza, Urban Cruiser आणि Swift Dzire या ३ संशयित गाड्यांची ओळख पटवली. दिल्ली, हरियाणातील बहादूरगढ, गुरुग्राम, सोनीपत, रोहतक, हासी, झज्जर, जींद आणि हिसार या शहरांमध्ये पोलिसांनी १२०० किलोमीटरचा आंतरराज्य पाठलाग करत धाडी टाकल्या. पोलिसांना पहिलं यश बहादूरगढमध्ये मिळालं, जिथे मुख्य आरोपी संदीपला पकडण्यात आले. त्याच्या माहितीवरून राकेश, शमिंदर पाल, लवप्रीत आणि परविंदर यांनाही अटक करण्यात आली. पडताळणीत मोठे खुलासे: चौकशीत आरोपींनी खुलासा केला की त्यांनी बॉलिवूड चित्रपट ‘स्पेशल 26’ मधून प्रेरणा घेऊन ही योजना आखली होती. मुख्य आरोपी संदीप, जो स्वतःला मध्य प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाचा ओएसडी (OSD) सांगत होता, त्याने संपूर्ण टोळी तयार केली. परविंदरने करोल बागमधील सोन्याच्या व्यवसायाची माहिती गोळा केली होती. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. ४३५.०३ ग्रॅम सोनं (विक्री न केलेला भाग), ३.९७ लाख रुपये रोख (लुटलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेला भाग), गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही गाड्या (Brezza, Urban Cruiser, Swift Dzire), बनावट दिल्ली पोलीस ओळखपत्र आणि पट्टे, लूटीतील सुमारे ४२८ ग्रॅम सोनं आरोपींनी विकून पैशांची वाटणी केली होती, त्यातील काही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाड्यांची ओळख पटवली आणि हा गुन्हा करताना वापरलेल्या बनावट ओळखपत्रांमुळे ते लवकर पकडले गेले. परविंदर, संदीप, लवप्रीत सिंह उर्फ काका, शमिंदर पाल सिंह उर्फ सिन्नी आणि राकेश शर्मा या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी दिल्ली-एनसीआरमध्ये आणखी अशाच घटना घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी विकलेल्या उर्वरित सोन्याची आणि या प्रकरणात सामील असलेल्या फरार आरोपींची चौकशी सुरू केली आहे.