काॅंग्रेसच्या दुसऱ्या यादीतही पुणे ‘होल्ड’वर

पुणे – काॅंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली आहे. मात्र, यातही पुण्यातील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाबाबत पक्षाकडून “वेट अॅंड वाॅच’ भूमिका घेण्यात आली आहे.
या दोन्ही मतदारसंघांत पक्षाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पक्षाकडून विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, उमेदवारी मिळण्यास उशीर होत असल्याने उमेदवारांची चांगलाची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ काॅंग्रेस पक्षाच्या वाट्याला आला आहे. तर, पक्षाकडून पर्वती विधानसभा मतदारसंघाची मागणीही करण्यात आली होती. मात्र, पक्षाकडून आतापर्यंत फक्त कसबा मतदरसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे.
पक्षातील स्थानिक नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर मतदारसंघात काॅंग्रेसकडून दत्ता बहिरट, मनीष आनंद तसेच दीप्ती चवधरी इच्छुक आहेत. तर माजी नगरसेवक सनी निम्हण यांनीही अर्ज केला आहे. मात्र, पक्षातील उमेदवारच द्यावा अशी मागणी स्थानिक नेत्यांनी विरोध केला असून केली आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची, यावरून पक्षात चर्चा सुरू आहे.
उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. अशीच स्थिती पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातही आहे. माजी राज्यमंत्री रमेश बागवे हे येथून इच्छुक असून, त्यांचे नाव येण्याची शक्यता असतानाच ते भाजपमध्ये जाणार असल्याचे मेसेज व्हायरल करण्यात आले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलेले अविनाश साळवेही येथून इच्छुक असून त्यांनीही तिकिटासाठी ताकद पणाला लावली आहे.
उमेदवारांची कोंडी
पक्षाकडून नेहमीप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केला जात असल्याने उमेदवारांची कोंडी होणार आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर छाननी आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया असणार आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवारांना ५ नोव्हेंबरपासून प्रचारास सुरूवात करता येणार आहे. त्यासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. त्यातच नेत्यांच्या सभा आणि फेऱ्यांमध्ये काही दिवस जाणार आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची कोंडी होण्याची शक्यता आहे.





