येत्या दोन दिवसात राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; कोकणात उष्णतेची लाट निर्माण होणार ?

मुंबई : राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी थंड आणि दुपारी गरम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात उन्हाळा सुरु होण्या अगोदरच तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची भीती आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,मुंबईमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीमध्ये 38.3 एवढं तापमान नोंदवण्यात आले होते. राज्याच्या इतर भागांबाबत बोलायचे झाल्यास मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली असून, सोलापूरमध्ये 36. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात देखील सूर्य तळपत असून, अनेक जिल्ह्यांत सरासरी तापमानापेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमान तापमान अधिक राहणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीसोबतच कच्छमध्ये देखील उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यात आहे. मात्र राज्याच्या इतर भागात उष्णतेची लाट येणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.





