IND vs NZ 2nd Test : साउदी ठरतोय रोहितसाठी डोकेदुखी, पुन्हा एकदा हिटमॅनला शून्यावरच दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता…

IND vs NZ 2nd Test (Rohit Sharma vs Tim Southee) : पुणे कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माच्या बाबतीत नेमके तेच घडले जे बंगळुरू येथे झाले होते. टीम साऊदीनं टाकलेल्या आणखी एका उत्कृष्ट चेंडूवर भारतीय कर्णधार त्रिफळाचीत झाला. हिटमॅन बेंगळुरूच्या पहिल्या डावाप्रमाणे पुण्यातही खाते न उघडताच माघारी परतला . साऊदीचा चेंडू समजण्यात रोहित पूर्णपणे अपयशी ठरला.
न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने कर्णधार रोहितची विकेट गमावल्यानंतर शुभमन गिल (नाबाद 10 धावा) आणि यशस्वी जैस्वाल (नाबाद 6) यांनी संयमी खेळी केली आणि दिवसअखेर आणखी पडझड होऊ न देता धावसंख्या 16 पर्यंत नेली. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 259 धावांवरच गारद झाला. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फिरत्या चेंडूने कहर केला आणि एकट्याने 7 फलंदाजांना बाद केलं तर आर. आश्विननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
रोहितचे पुन्हा शून्यावर माघारी…
न्यूझीलंडला 259 धावांत गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. रोहित सुरुवातीपासूनच क्रीजवर असह्य वाटत होता त्यामुळे एकूण 8 चेंडूंचा सामना करूनही त्याला खातेही उघडता आले नाही. टीम साऊथीच्या षटकातील (2.6) शेवटच्या चेंडूवर रोहित त्रिफळाचित झाला.
Rohit Sharma has been bowled for the third time in the series, twice now by Tim Southee 🎯😮https://t.co/3D1D83IgS1 #INDvNZ pic.twitter.com/gdFJapj2o6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 24, 2024
रोहितचे हावभाव पाहून तो सौदीचा हा चेंडू समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे रोहितला इच्छा नसतानाही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. हिटमॅन सध्याच्या कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.
साउदी ठरतोय रोहितसाठी डोकेदुखी..
कसोटी क्रिकेटमध्ये टीम साऊदी रोहित शर्मासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये किवी गोलंदाजाने चौथ्यांदा हिटमॅनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. 8 डावात, रोहितने सौदीविरुद्ध 126 चेंडूंचा सामना केला आहे आणि त्याच्या बॅटमधून 51 धावा निघाल्या आहेत. साऊदीविरुद्ध रोहितची फलंदाजीची सरासरी केवळ 12.75 आहे. साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 14 वेळा रोहितला बाद केले आहे.





