प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर (शेरखान शेख) – पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली असताना नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर गुणानुक्रमाने निवड न करता तालुका कोट्यानुसार विद्यार्थ्यांची निवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे झेडपीकडून शिरूर तालुक्याला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. शैक्षणिकदृष्ट्या प्रगत तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टावर अन्याय झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत कोणतीही नियमावली जाहीर केलेली नसताना कोणतीही माहिती पालक व शिक्षकांना देण्यात आलेली नव्हती. मात्र, अचानक तालुकानिहाय कोटा जाहीर करीत विद्यार्थी निवड करण्यात आली.संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील सहावी व सातवीच्या १५७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. नियोजनानुसार केवळ प्रत्येक तालुक्यातील १३ टक्के हुशार विद्यार्थ्यांची निवड झाली असून तालुकानिहाय कोट्यामुळे गुण जास्त असणारे विद्यार्थी वगळले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर, खेड, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील शाळांचा दर्जा चांगला असताना शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक, पालक व पदाधिकारी सतत प्रयत्नशील आहेत. अशा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलून पिछाडीवर असलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिल्याने गुणवत्तेचा दंड दिला जात असल्याने अनेक शिक्षक व पालक नाराज झाले आहेत. या निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून विद्यार्थ्याची देखील मानसिकता ढासळत आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून इस्रो – नासा अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना पारदर्शकतेचा अभाव दिसून आला वाहे. गुणवत्तेवर आधारित निवडीऐवजी कोट्यावर आधारित निवड ही शिक्षण क्षेत्रासाठी घातक ठरू शकते. जिल्हा परिषदेने हा निर्णय पुनर्विचारात घेऊन हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांनाच संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत. ३७ गुण मिळवणारे विद्यार्थी इस्त्रोला.. तालुकानिहाय गुण मार्क्स- शिरुर ८० गुण, आंबेगाव ६५ गुण, बारामती ६५ गुण, भोर ६२.५ गुण, दौंड ५२.५ गुण, हवेली ७० गुण, इंदापूर ६० गुण, जुन्नर ५६ गुण, खेड ७५ गुण, मावळ ५० गुण, मुळशी ६२. ५ गुण, पुरंदर ४७.५ गुण, वेल्हा ५५ गुण अशा प्रकारे गुण दिलेले असताना पुरंदर, दौंड व जुन्नरमध्ये ३७ ते ४० गुण मिळवणारे विद्यार्थी निवडले जाऊन शिरुर तालुक्यामध्ये ५० गुण मिळवणारा विद्यार्थी वगळला गेला आहे. तालुक्यावर अन्याय झाल्याचे बोलले जाऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अजित पवार यांना भेटणार.. पुणे जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतील निकालात घडलेल्या या प्रकाराबाबत आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले. याबाबत शिरूर तालुक्यावर अन्याय झाला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे यांनी सांगितले.